ठाणे : शहरातील कोणत्या कानाकोपऱ्यांत आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय मदत तत्काळ पोहोचण्यासाठी ठाणे महापालिकेने मोठा गाजावाजा करत ४५ लाख खर्च करून ३० बाइक ॲम्ब्युलन्स खरेदी केल्या. पण, सहा महिन्यांत त्या धूळखात पडल्यानंतर १५ बाइक अग्निशमन विभागाकडे सुपूर्द करण्यात येणार होत्या. मात्र, वर्ष लोटले तरी अद्यापही या विभागाला त्या पोहोचल्याच नाहीत. तर, कोरोनाकाळात त्यांचा वापर प्रभागनिहाय ॲन्टीजेन तपासणीसाठी करण्याच्या सूचना केल्या, पण अनेक प्रभाग आरोग्य अधिकाऱ्यांना याची माहितीच नाही. तर, काही जण याचा वापर कार्यालयीन कामकाजासाठी करत असल्याची माहिती पुढे आली आहे. १५ ॲम्ब्युलन्स जर वॉर्डमध्ये दिल्या असतील, तर बाकीच्या १५ कुठे गेल्या? जनतेच्या पैशांची अशी उधळपट्टी केली जाणार का? प्रशासनाने याबाबतची सखोल चौकशी करण्याची मागणी मनसेचे स्वप्नील महिंद्रकर यांनी केली आहे.
आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपलीदोन महिन्यांपूर्वीच आयुक्तांनी वॉर्डमध्ये ॲन्टीजेन तपासणीसाठी या बाइक ॲम्ब्युलन्सचा वापर करण्याचे आदेश दिले असले, तरी याबाबत विभाग अधिकारी अनभिज्ञ असल्याने आयुक्तांच्या आदेशालाच केराची टोपली दाखविली आहे. अनेक चांगल्या योजना लोकांच्या हिताच्या असल्या, तरी त्यांच्या अंमलबजावणीअभावी त्या केवळ कागदोपत्रीच राहत असल्याचे त्यांनी सांगितले.