- राजू काळे
भार्इंदर, दि. २१ - मीरा-भार्इंदर शहरात सतत वाढणा-या डासांच्या प्रादुर्भावर पालिकेने प्रभावी औैषध मिळविले आहे. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी थेट त्यांच्या उत्पत्तीवर घाला घालण्यासाठी पालिकेने डायफ्लूबेंजिरॉन या गोळीची मात्रा उपयोगात आणण्यास सुरुवात केली आहे.
शहरात अनेक ठिकाणे दलदलीची व त्यात वाढणा-या वनस्पतींची आहेत. तसेच शहरात मोठ्याप्रमाणात बांधकामे सुरु असून अशा ठिकाणी साठणा-या पाण्यात डासांची उत्पत्ती मोठ्याप्रमाणात होत असल्याचे पालिकेने वेळोवेळी केलेल्या सर्व्हेक्षणातून उघड झाले आहे. याउलट डेंगी (एडिस) हा डास तर स्वच्छ व अगदी कमी पाण्यात अंडी घालतो. त्यामुळे शहरात अनेकांना डेंग्युची लागण झाल्याचे वेळोवेळी समोर येते. त्यातही काही रुग्ण डेंग्युच्या आजाराने मरण पावतात. अशा डासांना तसेच त्यांच्या अळ्या व अंड्यांना नष्ट करण्यासाठी पालिकेकडून यापूर्वी किटकनाशक औषधांची फवारणी केली जात होती. परंतु, हा तात्पुरता प्रभाव ठरत असल्याने डासांच्या उत्पत्तीत कोणताही फरक न पडता त्यांचा प्रादुर्भाव सतत वाढतो आहे. दरम्यान डासांच्या उत्पत्तीला लगाम घालणारे डायफ्लूबेंजिरॉन औैषध गोळीच्या स्वरुपात परदेशात शोधून काढण्यात आले. तेथे त्या गोळीचा वापर प्रभावशाली ठरु लागल्याने जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्युएचओ) त्याला मान्यता दिली. त्या गोळ्यांचा वापर सध्या भारतातील काही ठिकाणी केला जात असल्याचा दावा केला जात आहे. गोळीची माहिती मीरा-भार्इंदर महापालिका प्रशासनालाा मिळाल्याने त्या गोळीचा प्रभाव प्रभाव स्वच्छता विभागाकडून तपासण्यात आला. त्यात गोळी प्रभावी ठरल्याने पालिकेने त्या गोळ्यांचा वापर करण्याचा निर्णय नुकताच घेतला. ही गोळी उघड्यावर साठलेल्या स्वच्छ तसेच अस्वच्छ पाण्यात टाकता येते. मात्र त्याचे प्रमाण प्रती ४० लीटर पाण्यामागे एक गोळी असे आहे. या गोळीमुळे डेंगी, मलेरिया, चिकुनगुनिया, झिका वायरस या डासांच्या अळ्या व अंडी नष्ट होत असल्याने वेगवेगळ्या डासांसाठी वेगवेगळे औषध वापरण्याची आवश्यकता नाही. आजही पालिका डास उत्पत्तीच्या काही ठिकाणी औषध फवारणी करतात. कारण गलिच्छ तसेच झोपडपट्टीतील रहिवाशी पाण्याच्या समस्येमुळे उघड्यावर पाणी साठवून ठेवतात. त्यात मोठ्याप्रमाणात डेंगी डासाच्या अळ्या अनेकदा आढळून आल्या आहेत. तरीदेखील साठविलेले पाणी टाकून देण्यास ते रहिवाशी विरोध करतात. त्यातच त्यामध्ये किटकनाशक औषध फवारणीला देखील मज्जाव करतात. त्यामुळे पालिकेच्या औषध फरवारणी मोहिमेत अडथळा निर्माण होतो. त्यावर उपाय म्हणुन या गोळ्यांची मात्रा प्रभावी ठरु लागली आहे. गोळ्या पिण्याच्या पाण्यातही टाकता येत असल्याने त्याचा आरोग्यावर कोणताही परिणाम होत नसल्याचे सांगण्यात येते. परंतु, भारतात त्याला अद्याप परवानगी देण्यात आली नसल्याचे आरोग्य विभागाकडुन सांगण्यात आले.