ठाणे : वाहन चालविण्याचा परवाना आणि आॅटोरिक्षाच्या परमिटसाठी बनावट कागदपत्रांचा वापर करणार्या टोळीचा पर्दाफाश ठाणे पोलिसांनी केला. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून आक्षेपार्ह कागदपत्रांचा मोठा साठा जप्त केल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.आॅटोरिक्षासाठी बॅज, परमिट तसेच वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करणार्या टोळीची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या भिवंडी युनिटला मिळाली होती. त्यानुसार १८ जानेवारी रोजी भिवंडी येथील धामणकर नाका येथील केजीएन संजरी आॅटो कन्सल्टंटवर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी भिवंडी येथील गैबीनगरातील नफीज सगीर अहमद फारूकी (३८) आणि हापसन आळीतील नाजील नवाज अहमद मोमीन (२८) यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याजवळून पोलिसांचे बनावट चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, बनावट रहिवासी दाखला, रिक्षा परमीट आणि मोटार वाहन विम्याची कागदपत्रे मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आली. बनावट कागदपत्र तयार करण्यासाठी वापरले जाणारे लॅपटॉप, संगणक आदी साहित्यही आरोपींकडून जप्त करण्यात आले. भिवंडीतील रहिवाशांकडून जास्त पैसे घेऊन त्यांना प्रादेशिक परिवहन कार्यालयातून वाहन चालविण्याचा परवाना, बॅज आणि परमिट मिळवून देण्याचा धंदा आरोपी गत ४ ते ५ वर्षांपासून करीत आहेत.आरोपींच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी भिवंडीतील निजामपुरा येथील मोहमद इस्माईल मोहम्मद रजा अन्सारी उर्फ पप्पु (३४) आणि शेलारगाव येथील संगमेश्वर मरोळसिद्ध स्वामी (४२) यांना अटक केली. मोहमद इस्माईल मोहम्मद रजा अन्सारी याच्या दुकानात संगमेश्वर मरोळसिद्ध स्वामी याच्या घरी पोलिसांनी छापा टाकून शाळा सोडल्याचे बनावट दाखले, डॉक्टरचा बनावट शिक्का, आरटीओ अधिकार्याचा शिक्का, बजाज अलायन्झ इन्शुरन्स कंपनीचा शिक्का आणि इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली. आरोपींविरूद्ध भोईवाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपींकडून चारित्र्य पडताळणीचे ४५ बनावट दाखले, शाळा सोडल्याचे २0 बनावट दाखले, वाहन चालविण्याचे ४९ परवाने, ३ लॅपटॉप, ३ संगणक, ५ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले. याशिवाय आॅटोरिक्षा पासिंगच्या २११ फाईल्स, विम्याच्या ३९ फाईल्स आणि वाहन चालविण्याच्या परवान्याच्या ३४ फाईल्सही आरोपींकडून हस्तगत करण्यात आल्या. या फाईल्स आरटीओ कार्यालयाच्या असून, त्या आरोपींजवळ कशा आल्या याचा तपास सुरू असल्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे, सहायक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
ड्रायव्हिंग लायसन्स, रिक्षा परमिटसाठी बनावट कागदपत्रांचा वापर, ठाण्यात चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 9:35 PM
ठाणे :आॅटोरिक्षासाठी बॅज, परमिट तसेच वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करणाºया चौघांना ठाणे पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून बनावट कागदपत्रे मोठ्या प्रमाणात हस्तगत करण्यात आली.
ठळक मुद्देठाणे पोलिसांची कारवाईबनावट कागदपत्रे हस्तगतबनावट शिक्केही जप्त