मीरा रोड : उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने मीरा-भार्इंदर महापालिकेने शहरातील आरजी व आरक्षणातील मैदाने यापुढे भाड्याने देण्यास बंदी आणली आहे. मात्र, असे असतानाही सर्रास मैदानांवर खाजगी कार्यक्रम केले जात आहेत. मीरा-भार्इंदरमधील बहुतांश मैदाने भाड्याने दिली जात असल्याने खेळाडू व नागरिकांना मैदानेच खेळण्यास मिळत नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने समोर आणले होते. शांतीनगरमधील मैदानांमध्ये काही ठिकाणी पालिकेने बांधकामे केली. राजकीय हेव्यादाव्यातून मुलांना खेळता येऊ नये, यासाठी मातीचे ढीग पालिकेने टाकले. पालिकेची मैदाने शनिवार व रविवारी भाड्याने दिली जात असल्याने खेळाडू, मुलांना हुसकावून लावले जायचे. ही वस्तुस्थिती ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यावर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्या आदेशाने सर्व प्रभाग समिती अधिकाऱ्यांना मैदाने भाड्याने देऊ नये, असे स्पष्ट कळवले होते. परंतु, इंद्रलोकमध्ये बाळासाहेब ठाकरे उद्यानात होळीनिमित्ताने एका समाजाचा कार्यक्रम झाला. पालिकेने मनाई केलेली असताना मैदान भाड्याने कसे दिले की, परस्पर कार्यक्रम करण्यात आला, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (प्रतिनिधी)
मैदानांचा वापर कार्यक्रमांसाठी सुरूच
By admin | Published: March 17, 2017 6:08 AM