ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या धर्तीवर जिल्हास्तरावर पीएसए म्हणजेच ऑक्सिजन डिस्ट्रिब्युशन प्लांट उभारणीला परवानगी द्यावी अशी आग्रही मागणी आज राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज, सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीत शिंदे यांनी ही मागणी केली.
कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर रुग्णांना बेड, ऑक्सिजन पूरवठा आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याने तो उपलब्ध करून देण्याबाबत या बैठकीत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. यावेळी, ऑक्सिजन पुरवठ्याबाबत लोकांना तातडीने दिलासा देण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने शहरात तीन ठिकाणी ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या धर्तीवर ज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन जनरेशन आणि डिस्ट्रिब्युशन प्लांट उभारणीला तात्काळ मंजुरी मिळावी, महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना याबाबतचे सर्वाधिकार द्यावेत; तसेच हवेतून ऑक्सिजन घेऊन पेशंटला पुरवणाऱ्या पोर्टेबल ऑक्सिजन कॉसंट्रेटरच्या खरेदीला देखील तात्काळ मंजुरी देण्यात यावी. ही खरेदी जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर व्हावी, अशी मागणी शिंदे यांनी केली. या मागणीला तात्काळ मंजुरी देत तसा शासन आदेश काढण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी ठाणे शहरातील कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सद्यस्थितीत १६ हजार ऍक्टिव्ह पेशंट शहरात, तर जिल्ह्यात ५६ हजार रुग्ण आहेत. यापैकी बहुतांश पेशंटला ऑक्सिजनची गरज लागत आहे. अशात शासनाकडून देण्यात येणारा 180 मेट्रिक टन पुरवठा कमी पडत असल्याने तो 300 मेट्रिक टन पर्यंत वाढवून मिळावा, अशी मागणी त्यांनी केली.
राज्यात रेमडेसिवीयर इंजेक्शनचा तुटवडा असल्याने रुग्णांचे जीव धोक्यात आले आहेत. हे इंजेक्शन मिळवण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांची वनवण करावी लागत आहे. त्यामुळे सरकारकडून मान्यताप्राप्त 7 कंपन्यांकडून हे औषध खरेदी करताना किमतीवरून हात आखडता न घेता लवकरात लवकर या इंजेक्शनची खरेदी करून सर्वसामान्य लोकांना दिलासा द्यावा अशी सूचनाही शिंदेंनी केली आहे.