स्टार १०९७
अनिकेत घमंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : तरुणांपासून वृद्धांपर्यंत अनेक जण चष्म्याऐवजी आता कॉन्टॅक्ट लेन्स वापरू लागले आहेत. मात्र, लेन्स वापरताना काळजी न घेतल्यास जंतुसंसर्ग किंवा बुबुळाला इजा होऊ शकते. प्रसंगी डोळ्याला धोका होऊन तो गमवावा लागू नये, यासाठी लेन्स वापरताना काळजीपूर्वक वापर करणे अत्यावश्यक आहे.
डोळ्यांची काळजी घेण्याबाबत सातत्याने नेत्रतज्ज्ञ जनजागृती करतात; पण तरीही अनेकांमध्ये त्याबाबत सजगता येत नसल्याची खंत तज्ज्ञ व्यक्त करतात. सातत्याने याबाबत सूचना करूनही अनेक रुग्ण त्याबाबतची काळजी घेत नसल्याचे निदर्शनास आले आहे. वर्क फ्रॉम होम, तसेच ऑनलाइन शिक्षण पद्धतीत डोळ्यांचे विकार, तक्रारी वाढल्या आहेत. डोळ्यांची निगा राखण्यात नागरिक कमालीची निष्काळजी घेत असल्याचे शहरातील नेत्रतज्ज्ञांचे म्हणणे आहे. ज्यांना चष्मा नकोय, त्यांनी लेन्स जरूर वापराव्यात; पण त्यासोबत लेन्स, डोळे यांची खूप काळजी घ्यायला हवी, असे तज्ज्ञांनी सांगितले.
---------------------
चष्म्याला करा बाय बाय
चष्म्याला बाय बाय करून कोणीही लेन्स वापरू शकतो; परंतु त्या नेत्रतज्ज्ञांच्या सल्ल्यानेच वापराव्यात. त्या काढता, घालताना भरपूर काळजी घ्यायला हवी, ती काळजी जबाबदारीने पार पडणाऱ्यांना लेन्सचा पर्याय सर्वोत्तम आहे; पण ज्यांना काळजी घेता येत नसेल, त्यांनी लेन्स घालू नयेत, असेही नेत्रतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
-----------------
...ही काळजी घेणे आवश्यक
- डोळे स्वच्छ ठेवा
- लेन्सची काळजी घ्यावी
- संसर्ग होणार नाही, यासाठी खबरदारी घेतली पाहिजे
- लेन्सचे सोल्युशन घेऊन त्यात त्या निर्जंतुक केल्या पाहिजेत
- लेन्सचा कालावधी संपताच त्या बदलण्याची गरज आहे
–------------------------
डोळे हे आपले सौंदर्य आहे. त्यासोबत शरीराची काळजी घ्यायलाच हवी. डोळे जास्त संवेदनशील असतात, त्यांना संसर्ग तत्काळ होऊ शकतो. लेन्स वापरायला काहीच हरकत नाही; पण त्यासोबतच हात स्वच्छ धुणे, निर्जंतुक करणे, डोळे सतत न चोळणे. सतत डोळ्याला हात न लावणे. डोळे कोरडे पडू न देणे, पडल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तात्काळ सोल्युशन टाकणे. डोळे लाल झाले असतील किंवा संसर्ग असेल, तर लेन्स घालू नयेत. अशा प्राथमिक स्तरावर काळजी घेतल्यास डोळ्यांची निगा राखणे सहज शक्य आहे.
-डॉ. अनघा हेरूर, नेत्रतज्ज्ञ डोंबिवली
--------------