ठाणे : बोटात अडकलेली अंगठी काढण्यासाठी चक्क ग्राइंडरचा वापर करणाऱ्या येथील एका रुग्णालयाच्या एका साहाय्यकावर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार घडल्यानंतरही रुग्णालयाने उपचारासाठी पैसे उकळल्याचा आरोप होत आहे.
साई वात्सल्य अपार्टमेंट, नितीन कंपनीजवळ, पाचपाखाडी-ठाणे येथे राहणारा पार्थ सतीश टोपले (वय १४) याच्या उजव्या हाताच्या बोटामध्ये अंगठी अडकली होती. ती निघत नसल्याने त्याची आई शीतल सतीश टोपले यांनी त्याला ३ जुलैला खोपट येथील या रुग्णालयामध्ये नेले होते. त्यावेळी एकाही वैद्यकीय अधिकाऱ्याने मुलाकडे पाहिले नसून, रुग्णालयातील कनिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याने तपासणी करून, औषधे देऊन मुलाला घरी पाठविले, असा आरोप तिने केला आहे. परंतु त्यानंतर याच रुग्णालयातील स्वप्निल होतकर याने फोन करून रुग्णालय व्यवस्थापनाने मुलाच्या बोटातील अंगठी काढण्यासाठी पाठविल्याचे टोपले यांना सांगितले. त्यानंतर त्याने धारदार ग्राइंडरचा वापर करून अंगठी काढण्याचा प्रयत्न केला; पण ती न निघता पार्थ याच्या बोटाला गंभीर दुखापत होऊन त्याची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला कळव्याच्या शिवाजी रुग्णालयात नेले. तेथे त्याच्यावर कांगारू पद्धतीने उपचार करण्यात आले. त्याच्या हातावर, पोटावर शस्त्रक्रिया करून बोट सुमारे महिनाभर पोटात ठेवून ते आता त्याच्या हाताला जोडले. हा घटनाक्रम शीतल यांनी मनसेचे ठाणे शहर सचिव अक्षय करंजवकर यांना सांगितल्यानंतर त्यांनी या रुग्णालयाच्या दोषी कनिष्ठ साहाय्यक डॉक्टरवर नौपाडा पोलिसांत गुन्हा दाखल करून या प्रकरणी रुग्णालयाचा परवाना रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. या संदर्भात रुग्णालयाशी संपर्क साधला असता, तेथील नर्सने आता डॉक्टर उपलब्ध नसल्याचे सांगून फोन कट केला.