मीरा राेड : उत्तनच्या मच्छीमारांच्या जाळ्यात बुधवारी सुमारे २० फूट लांब आणि १५०० किलाे वजनाचा व्हेल (बहिरी) मासा सापडला हाेता. या दुर्मीळ माशाची दाेन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर जाळे कापून सुटका करून त्याला जीवनदान दिले.
उत्तनच्या भाटेबंदर येथील डेव्हिड गऱ्या या नाखवाची सहारा ही बोट आहे. त्यांनी मासेमारीसाठी बुधवारी समुद्रात किनाऱ्यापासून सुमारे १० ते १२ नॉटिकल मैल अंतरावर जाळी टाकली होती. या जाळ्यात व्हेल मासा सापडला. या माशाला वर ओढून दाेन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर जाळे कापून या माशाची नाखवा आणि खलाशांनी खाेल समुद्रात सुटका केली. व्हेल, डॉल्फिन, देवमासा, कासव आदी संरक्षित जीव असून त्यांची शिकार वा मासेमारी करण्यास कायद्याने बंदी आहे, तरीही काही माफिया त्यांची शिकार करतात. व्हेलच्या पंखांना काळ्याबाजारात मोठी किंमत आहे. शासनाकडून व्हेल व इतर दुर्मीळ व बंदी असलेल्या माशांची सुखरूप सुटका केल्यास आर्थिक रक्कम प्रोत्साहनपर दिली जाते. या माशांची सुटका करण्यासाठी मच्छीमारांना त्यांची महागडी जाळी कापावी लागत असल्याचे स्थानिक नगरसेविका शर्मिला गंडोली यांनी सांगितले.