मीरारोड - यंदा उन्हाळा तीव्र असल्याने आधीच उकाड्याने त्रासलेल्या उत्तनवासियांना गेल्या काही दिवसांपासून विजेच्या खेळखंडोबाने आणखी जाच सहन करावा लागत आहे.
भाईंदर पश्चिमेच्या उत्तन भागातील मच्छीमार , शेतकरी आणि अन्य रहिवाशी हे वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने संतप्त आहेत . येथील माजी नगरसेविका शर्मिला बगाजी यांनी सांगितले कि , गेल्या ४ दिवसां पासून विजेचा लपंडाव सुरु आहे . वीज येते - जाते . त्यातच काल रात्री एका विजेच्या लाल बॉक्स मध्ये स्फोट सारखे जाणवल्याने लोकं घाबरली . दिवसा तर वीज जात असतेच पण रात्री देखील वीज गुल होत असल्याने लोकांची उकाड्यामुळे झोप उडाली आहे .
एस्टेलिना तानिया यांनी सांगितले की, दिवसाच्या वेळेत बऱ्याचवेळा वीज गेल्यानंतर अर्धा तास येत नाही . गुरुवारी सायंकाळी वीज गेली ती रात्री साडे दहाच्या सुमारास आली . पुन्हा पावणे बारा वाजता गेली ती मध्यरात्री १ वाजता आली. वीज नसल्याने घरात उकाडा असह्य होतो व झोप मिळत नाही . ज्यांच्या घरात लहान बाळ आहेत त्यांना गरमी मुळे बाळांचे हाल व रडणे सहन होत नाही .
वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्या विजेची भरमसाठ रकमेची बिले बरोबर वसूल करतात . एखाद्याचे बिल राहिले तर वीज कापतात . पण उत्तन भागातील बहुतांश नागरिक वेळेत वीज बिल भरत असताना सातत्याने विजेचा लपंडाव का सहन करायचा ? वीज गेल्यास तात्काळ पर्यायी व्यवस्था कंपनीने केली पाहिजे . ह्या मुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोच पण व्यावसायिकांना सुद्धा वीज गेल्याने फटका बसतो असा संताप येथील लोकांनी बोलून दाखवला .