लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: आजमगढ जिल्हयात दरोडा टाकून पसार झाल्यामुळे उत्तरप्रदेश सरकारने ५० हजारांचे बक्षीस घोषित केलेल्या असवद शेख (रा. आझमगढ, उत्तरप्रदेश) या कुख्यात गुन्हेगाराला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने गुरुवारी ठाण्यातील नौपाडा भागातून अटक केली. त्याला उत्तरप्रदेश पोलिसांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले आहे.आजमढ जिल्हयातील फुलपूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील एक वाहन अडवून त्या वाहनातील व्यक्तीकडून १२ लाख २० हजारांची रोकड असलेली बॅग शेख आणि त्याच्या सहकाऱ्यांनी लुटून पसार झाला होता. याप्रकरणी २७ सप्टेंबर २०१९ रोजी फुलपूर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. हा दरोडयाचा प्रकार घडल्यापासून त्याचा शोध घेण्यात येत होता. मात्र, तो उत्तरप्रदेश पोलिसांना हुलकावणी देत होता. त्यामुळेच त्याला पकडून देणाºयाला आजमगढ येथील पोलीस अधीक्षकांनी ५० हजारांचे बक्षीस जाहीर केले होते. उत्तरप्रदेशच्या लखनऊ येथील मुख्यालयाचे स्पेशल टास्क फोर्समार्फत या गुन्हयाचा तपास सध्या सुरु आहे. उत्तरप्रदेशातून पसार झालेला हा कुख्यात आरोपी सध्या ठाणे शहरात असल्याची माहिती लखनऊच्या एसटीएफला २५ फेब्रुवारी २०२१ रोजी मिळाली होती. हे पथक ठाण्यात आल्यानंतर त्यांनी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्याकडे त्याला अटक करण्यासाठी मदतीची मागणी केली. त्यानुसार पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय येनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने लखनऊ एसटीएफचे उपनिरीक्षक संतोषकुमार सिंह यांच्यासह संयुक्त कारवाई करुन ठाण्यातील नौपाडा परिसरातील हरिनिवास येथे सापळा रचून असवद शेख याला ताब्यात घेतले. पुढील कार्यवाहीसाठी त्याला लखनऊ पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
उत्तरप्रदेश सरकारने ५० हजारांचे बक्षीस जाहीर केलेला १२ लाखांच्या दरोडयातील वॉन्टेड गुन्हेगार जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 9:38 PM
आजमगढ जिल्हयात दरोडा टाकून पसार झाल्यामुळे उत्तरप्रदेश सरकारने ५० हजारांचे बक्षीस घोषित केलेल्या असवद शेख (रा. आझमगढ, उत्तरप्रदेश) या कुख्यात गुन्हेगाराला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने गुरुवारी ठाण्यातील नौपाडा भागातून अटक केली.
ठळक मुद्दे ठाणे गुन्हे शाखेची कारवाई