ठाणे : उत्तर प्रदेश (यूपी) राज्यातील आजमगढ जिल्ह्यात आपल्या साथीदारांसह दरोडा टाकून पसार झालेल्या उमर उर्फ उमर अहमद अतीकुरहमान उर्फ अब्दुल रहमान शेख (३२, निजामाबाद, जिल्हा आजमगढ, उत्तर प्रदेश) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एक आणि यूपीच्या विशेष कृती दलाच्या (एसटीएफ) पथकाने संयुक्त कारवाईत सोमवारी अटक केली. त्याच्यावर उत्तर प्रदेश पोलिसांनी ५० हजारांचे बक्षीस ठेवले होते.
उत्तर प्रदेशातील आजमगढ जिल्ह्यातील फुलपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०१९ मध्ये शेख याने त्याच्या साथीदारांसह जबरी दरोडा टाकला होता. या घटनेतील मुख्य आरोपी उमर शेख हा मात्र गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. त्याची माहिती देणाऱ्याला ५० हजारांचे बक्षीस पोलिसांनी घोषित केले होते. हा दरोडेखोर ठाण्यात लपल्याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांच्या एसटीएफला मिळाली होती. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस उपायुक्तांकडे मदतीची मागणी केली होती. त्यानुसार अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय येनपुरे आणि उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकच्या पथकाने आरोपीचा शोध घेतला. तो ठाणे रेल्वेस्थानक परिसरात येणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल जाधव यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा लावून शेख याला वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणी, एपीआय जाधव तसेच एसटीएफचे उपनिरीक्षक शैलेंद्रकुमार आदींच्या पथकाने ठाणे स्थानक परिसरातून ६ जून रोजी ताब्यात घेतले. त्याला ७ जून रोजी उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली.