ठाणे, दि. 26 - सिद्धेश्वर तलाव परिसरातील सहा वाहनांना आगी लावणा-या आणि तीन अल्पववयीन मुलींच्या अहपहरणाचा यशस्वी तपास करणा-या नौपाडा पोलिसांचा पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी विशेष सत्कार केला. बुधवारी पोलीस आयुक्तालयात झालेल्या गुन्हे आढावा बैठकीत प्रमाणपत्र देऊन या अधिका-यांचा विशेष सन्मान केला.खोपट, सिद्धेश्वर तलाव परिसरातील शिवसेना उपविभाग विनोद पाटेकर आणि एका महिलेच्या रिक्षासह सहा वाहनांची १६ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास जाळपोळ करणा-या रोहन सावंत (२०), हिमांशू उर्फ टिनू सावंत (२०) आणि ओंकार भोसले यांना नौपाडा पोलिसांनी अवघ्या १८ तासांमध्ये अटक केली. या प्रकरणाचा छडा लावणारे पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक विशाल बनकर, हवालदार सचिन खरटमोल, आर. एन. भोई आणि आर. एम. शेकडे यांचा बुधवारी पोलीस आयुक्तांनी विशेष सत्कार केला.तर १७ जुलै रोजी सिद्धेश्वर तलाव परिसरातून अपहरण करण्यात आलेल्या तीन पैकी दोन मुलींचा शोध घेऊन तिघांना २४ तासांच्या आतच बेडया ठोकणा-या उपनिरीक्षक शिरीष यादव, प्रशांत लोंढे, हवालदार सुनिल अहिरे, शब्बीर फरास यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.दरम्यान, नौपाडयातील एका खासगी वित्त कंपनीवर दरोडयासाठी आलेल्या झारखंडच्या १५ जणांच्या टोळीला जेरबंद करणारे गुन्हे अन्वेषण विभागाचे युनिट एकचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांचाही यावेळी पोलीस आयुक्तांनी विशेष सन्मान केला.
वाहने जळीत कांडाचा तपास लावणा-या नौपाडा पोलिसांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 11:00 PM