लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा वेग वाढण्याची गरज व्यक्त करून जिल्ह्यातील अंथरुणाला खिळलेले रुग्ण, गर्भवती, बेघर, भिकारी आणि मनोविकार रुग्ण आदींचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचे निर्देशही ठाणे जिल्हा प्रशासनाने जिल्हा कृती दलाच्या बैठकीत गुरुवारी डॉक्टरांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात आरोग्य यंत्रणेची बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी घेऊन भिकारी, मनोरुग्णालयात लसीकरणाकडे डॉक्टरांचे लक्ष वेधले. जिल्ह्यात आतापर्यंत ५९ टक्के नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे यांनी सांगितले.
या बैठकीस ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांडगे, अपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. अंजली चौधरी यांच्यासह ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मीरा- भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी, बदलापूर येथील महापालिकांचे लसीकरण अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी या बैठकीला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. ज्या आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट वर्कर यांनी दुसरा डोस घेतलेला नाही, त्यांचे लसीकरण तातडीने पूर्ण करून घ्यावे, असे निर्देश या वेळी आरोग्य यंत्रणेला देण्यात आले.
--------------