ठाणे : ठाणे महापालिकेने आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड १९ ची लस देण्यामध्ये आज १० हजारांचा टप्पा पार केला आहे. आजपर्यत १०११६ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देवून ठाणे महापालिकेने ११४.९ टक्के उदिदष्ट पूर्ण केले आहे. येत्या दोन दिवसात फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या पोलीस व ठामपा सफाई कर्मचाऱ्यांना लस देण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या विभागामध्ये शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार १६ जानेवारी २०२१ रोजी लसीकरणास सुरूवात करण्यात आली. या लसीकरण मोहिमेअंतर्गत् सर्वप्रथम आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स व त्यानंतर ५५ वर्षावरील नागरिक आणि ज्या ५५ वर्षावरील नागरिकांना उच्च रक्तदाब, मधुमेह व इतर आजार आहेत अशा तीन टप्प्यांमध्ये लसीकरण पूर्ण करण्यात आहे.
या लसीकरण मोहिमेमध्ये आजपर्यत ८८ लसीकरण सत्र कार्यान्वित करण्यात आली होती. यामध्ये एकूण ८८०० इतक्या लाभार्थ्यांना लस देणे अपेक्षित होते. परंतु ठाणे महानगरपालिकेने १०११६ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देवून आपले ११४.९ टक्के उदिदष्ट पूर्ण केलेले आहे. पुढच्या टप्प्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण करता यावे यासाठी लसीकरण केंद्रांची संख्या देखील वाढविण्यात येणार आहे.