ठाणे : एकीकडे ४५ वर्षांवरील ठाणेकरांचे लसीकरण सुरू असताना ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातील जवळपास १२५ मनोरुग्णांचे लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती मनोरुग्णालय प्रशासनाने दिली. आधारकार्ड नसलेल्या मनोरुग्णांच्या लसीकरणाबाबतही ठाणे महापालिकेशी चर्चा करून त्यांच्यासाठी स्वतंत्र लसीकरण ठेवण्यात येणार आहे.
सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक, त्यानंतर ४५ वर्षांवरील आणि तिसऱ्या टप्प्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्याची घोषणा झाली होती. परंतु, लसीकरणाचा गोंधळ उडाल्याने सध्या १८ ते ४४ वयोगटातील आणि पहिला डोस शिल्लक असल्याचे लसीकरण बंद आहे. लसींच्या तुटवड्याचा फटका नागरिकांबरोबर मनोरुग्णांनाही बसत आहे. त्यामुळे धीम्या गतीने मनोरुग्णांचे लसीकरण सुरू आहे. ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात लसीकरण करताना वयाचे बंधन न पाळता सरसकट मनोरुग्णांना लस देण्याचा निर्णय घेतला असल्याचे मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय बोदाडे यांनी सांगितले. मनोरुग्णालयात २० मे पासून सुरू झालेल्या लसीकरणात जवळपास १२५ मनोरुग्णांचे लसीकरण झाल्याचे त्यांनी सांगितले.
७२५ मनोरुग्णांचे लसीकरण शिल्लक
सध्या मनोरुग्णालयात महिला व पुरुष मिळून ८५० मनोरुग्ण दाखल आहेत. उर्वरित मनोरुग्णांचे लसीकरण टप्प्याटप्प्याने होणार आहे. जे मनोरुग्ण अनोळखी म्हणून दाखल होतात त्यांचे आधारकार्ड नसते. त्यामुळे ठाणे महापालिकेशी चर्चा करून त्यांच्यासाठी लवकरच वेगळे लसीकरण आयोजित केले जाईल, असे डॉ. बोदाडे यांनी सांगितले.