कल्याण : एकीकडे कल्याण जिल्हा कारागृहात कोरोनाचा शिरकाव झाला असताना दुसरीकडे कारागृहातील ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या कैद्यांचे लसीकरण प्रशासनाने सुरू केले आहे. आतापर्यंत २९६ कैद्यांचे लसीकरण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू असताना त्याची लागण आता कल्याण जिल्हा कारागृहातील कैद्यांना झाल्याचे रविवारी झालेल्या कोरोना चाचणीत समोर आले. कारागृहातील ३५० जणांची कोरोना चाचणी केली असता त्यात ३० कैदी कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यांना सोमवारी दुपारी ठाणे सिव्हिल रुग्णालयात उपचारार्थ हलविले होते; परंतु त्याठिकाणी झालेल्या तपासणीत संबंधित कैद्यांना सौम्य लक्षणे असल्याने तसेच त्यांची प्रकृती ठीक असल्याने सर्वांना भिवंडी येथील टाटा आमंत्र कोविड सेंटरमध्ये ठेवले आहे. सद्य:स्थितीला या ३० कैद्यांव्यतिरिक्त कारागृहातील अन्य कोणत्याही कैद्याला कोरोनाची लागण झालेली नाही. दरम्यान, कारागृहातील ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या कैद्यांचे कोविड लसीकरण सुरू केले आहे. जास्तीत जास्त कैद्यांचे तातडीने लसीकरण करून घेण्याचे कारागृह प्रशासनाचे उद्दिष्ट आहे. सध्यातरी २९६ कैद्यांचे लसीकरण झाल्याची माहिती मिळत आहे. १ मे पासून १८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींचेही लसीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कारागृहात सद्य:स्थितीला क्षमतेपेक्षा अधिक असे १९२२ कैदी आहेत. त्यामुळे सर्वांचे लसीकरण करणे कारागृह प्रशासनासमोर मोठे आव्हान असणार आहे.
------------------------------------------------------