ठाणे : वकील हासुद्धा समाजव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक आहे. त्यांचाही नागरिकांशी नियमित संपर्क येत असून त्यांना सार्वजनिक ठिकाणी वावरावे लागते. त्यामुळे गुरुवारी महापौर नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीमध्ये ठाणे न्यायालयातील बार रूममध्ये वकिलांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम आयोजित केली होती. यामध्ये ३५० वकिलांचे लसीकरण झाले.
पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर म्हस्के यांच्या प्रयत्नाने गुरुवारी या विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन केले होते. यावेळी उपमहापौर पल्लवी कदम, नगरसेवक सुधीर कोकाटे, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, आदी उपस्थित होते.
कोरोना काळातही वकिलांचे काम हे अविरत सुरू होते. यासाठी त्यांचे लसीकरण प्राधान्यक्रमाने होण्याच्या दृष्टीने यापूर्वी महापालिकेच्या वाडिया रुग्णालयात तीन वेळा तर बार रूम येथेही लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते. या सर्व शिबिरांना वकिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता; परंतु अद्यापपर्यंत ज्या वकिलांचे लसीकरण झाले नाही, तसेच ज्यांचा दुसरा डोस बाकी आहे, अशा वकिलांसाठी बार रूममध्ये विशेष लसीकरण मोहीम आयोजित केल्याचे महापौरांनी सांगितले. याप्रसंगी कोविशिल्ड लसीचे ३०० आणि कोवॅक्सिन लसीचे ५० डोस उपलब्ध केले होते.
यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश अनिल पानसरे, एन. के ब्रह्मे, ठाणे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत कदम, उपाध्यक्ष इंद्रपाल पाटील, सचिव संजय म्हात्रे, सहसचिव संदीप डोंगरे, रेखा हिवराळे, खजिनदार गणेश नलावडे, अध्यक्षा पूजा कदम, रूपाली म्हात्रे, रूपाली शिंदे, राजाराम तारमळे आणि विकास जोशी, आदी उपस्थित होते.