- सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिकेने रिक्षा चालकांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविली असून महापौर लिलाबाई अशान, शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, नगरसेवक धनंजय बोडारे आदींच्या उपस्थित लसीकरण मोहिम एनसीटी शाळेसह सहा ठिकाणी सुरू झाली. तर शहरातील ४५ टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतल्याची माहिती महापालिका लसीकरण मोहिमेच्या प्रमुख डॉ अनिता सपकाळे यांनी दिली.
उल्हासनगर महापालिका आरोग्य विभागाने आरोग्य कर्मचारी व डॉक्टर, महापालिका सफाई कामगार, कर्मचारी व अधिकारी, शिक्षक, पत्रकार, नगरसेवक आदींसाठी विशेष कोरोना लसीकरण मोहीम राबविली. महापौर लिलाबाई अशान यांच्या संकल्पनेतून अमृत महोत्सव व महात्मा गांधी जयंती निमित्त शहरातील रिक्षाचालकांसाठी विशेष लसीकरण मोहीम शनिवारी यशस्वीपणे राबविली. त्यासाठी पूर्व व पश्चिमेला प्रत्येकी ३ असे सहा लसीकरण केंद्र सुरू केले होते. एनसीटी शाळेत महापौर लिलाबाई अशान, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, उपशहरप्रमुख अरुण अशान, शिवसेना नेते धनंजय बोडारे आदींच्या उपस्थितीत रिक्षाचालक लसीकरण मोहिमेची सुरवात झाली. २ हजारा पेक्षा जास्त रिक्षाचालकांनी लसीचा फायदा घेतल्याचा अंदाज महापौर लिलाबाई अशान यांनी व्यक्त केला.
शहरातील ४५ टक्के म्हणजे अड्डीच लाखा पेक्षा जास्त नागरिकांनी आजपर्यंत लसीचा पहिला डोस घेतल्याची माहिती महापालिका लसीकरण मोहिमेच्या प्रमुख डॉ अनिता सपकाळे यांनी शनिवारी महापौर कक्षात पत्रकारांना दिली. यावेळी महापौर लिलाबाई अशान, नगरसेवक अरुण अशान, महापालिका सचिव प्रतिभा कुलकर्णी उपस्थित होत्या. महापौरांनी यावेळी शहरातील लसीकरण मोहिमेचा आढावा घेतल्याने, लसीकरणा बाबत शहर शेजारील शहारा पेक्षा पुढे असल्याची माहिती उघड झाली. लसीकरणाचा वेग असाच वाढविणार असल्याचे संकेत महापौरांनी दिले. तसेच शहरात कोरोना रुग्णाची संख्या झपाटयाने कमी होत असून महापालिका कोरोना रुग्णालयात फक्त ४ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती महापौरांनी दिली.
कोरोना लसीकरण मोहिमेचे कौतुक महापालिका कोविड रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय आदींसह इतर कर्मचार्यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्याचे संकेत महापौर लिलाबाई अशान यांनी दिले. तसेच लसीकरण मोहिमेचे कौतुक करून अश्या कर्मचाऱयांना पालिका प्रशासन प्रोत्साहन देणार असल्याचे महापौर म्हणाल्या.