ठाणे : कोर्टयार्ड कॉम्प्लेक्स आणि ज्युपिटर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी कॉम्प्लेक्सच्या क्लब हाऊसमध्ये ५२५ स्थानिकांचे लसीकरण करण्यात आले. यात १८ वर्षांच्या वयोगटापासून पुढील नागरिकांनी लाभ घेतला.
ठाणे शहरात गृहसंकुलात लसीकरण करण्याचे आवाहन केल्यानंतर लसीकरण करण्यासाठी अनेक सोसायटी पुढाकार घेतला आहे. कोर्टयार्ड कॉम्प्लेक्सनेही रहिवाशांच्या लसीकरणासाठी पुढाकार घेतला. त्यांनी केवळ रहिवासीच नव्हे तर परिसरातील इतर नागरिकांचेही लसीकरण करून घेतले. सकाळी ८.३० वाजता सुरू झालेले लसीकरण सायंकाळी पूर्ण झाले. बिछान्यावर पडून असलेल्या चार रहिवाशांचे लसीकरण करण्यात आले. यात ९२ वर्षांच्या आजीनेही लस घेतली. पहिला आणि जे दुसरा डोस घेण्यास पात्र आहेत अशांना कोविशिल्डची लस देण्यात आली. याआधी कॉम्प्लेक्सने नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. या कार्यक्रमासाठी अजित पुराणिक आणि हरीश नायर यांनी पुढाकार घेतला होता. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कॉम्प्लेक्समध्ये लसीकरण मोहीम राबविली. जितके कॉम्प्लेक्स यात सहभागी होऊन पुढाकार घेतील तितके चांगले होईल, असे नायर म्हणाले.
------------------
माझा हा पहिला डोस होता. लसीसाठी मी गेले १५ दिवस स्लॉट बुक करत होतो, पण मिळत नव्हते. बाहेर जाऊन रांग लावण्यापेक्षा आज कॉम्प्लेक्समध्ये लसीकरणाची सोय झाली याचा आनंद आहे.
- संग्राम पाटील, रहिवासी
-----------------
मला जेव्हा समजले येथे लसीकरण होत आहे, तेव्हा मी पटकन नोंदणी केली. जवळच लसीकरणाची सोय उपलब्ध झाली हे उत्तम झाले.
- श्रीदेवी दिनाबाही, रहिवासी, सिद्धाचल सोसायटी