ठाणे : मागील तीन ते चार दिवसांपासून लसींचा साठाच उपलब्ध न झाल्यामुळे ठाणे शहरातील लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर ओढवली होती. मात्र, शुक्रवारी लसींचा साठा उपलब्ध झाल्यानंतर शनिवारपासून पुन्हा लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. यावेळी १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
कोरोनाची तिसरी लाट थांबवायची असेल तर वेगाने लसीकरण होणे हा प्रभावी पर्याय आहे. त्यादृष्टीने प्रयत्नांची पराकाष्टाही सुरू आहे. उपलब्ध होणाऱ्या लसींचा डोस युद्धपातळीवर देण्यासाठी ठाणे महापालिका प्रयत्न करत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून लसींचा पुन्हा तुटवडा जाणवू लागल्याने त्याचा फटका शहरातील लसीकरणावर बसत आहे. सोमवारी महापालिकेने एकाच दिवशी २२ हजार जणांचे लसीकरण करून विक्रम केला. मात्र, दुसऱ्याच दिवशी साठा नसल्याने केंद्र बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर ओढवली. त्यात मंगळवारी साठा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, गुरुवारी सायंकाळपर्यंत लस उपलब्ध झाली नाही. त्यामुळे सलग तीन दिवसांपासून लसीकरण केंद्रे बंद ठेवली होती.
शनिवारी ४० केंद्रांच्या माध्यमातून लसीकरण करण्यात येणार असून १८ वर्षांवरील सर्वाना लस देण्यात येणार आहे. तर, कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन असे दोन्ही डोस उपलब्ध असल्याची माहिती ठाणे पालिका प्रशासनाने दिली.