- राजू काळे
भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या आरोग्य विभागात श्वानदंशावरील लसच उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब उजेडात आली असुन काही औषधांचा देखील तुटवडा असल्याचे समोर आले आहे. यामुळे सामान्य रुग्णांना जास्त रक्कम मोजून खाजगी रुग्णालयात उपचारासाठी धाव घ्यावी लागत आहे.
पालिकेने शहरातील भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांच्या निर्बिजीकरणाची मोहिम सुरु केली असली तरी दरम्यानच्या काळात निर्बिजीकरण केंद्रच बंद पडल्याने शहरात श्वानांची पिलावळ वाढल्याचे दिसुन येत आहे. श्वानांचे केवळ निर्बिजीकरण करणे पुरेसे नसुन त्यांच्यावर ठराविक अंतराने आवश्यक लसीकरण करणे देखील गरजेचे असल्याचे मत एका खाजगी रुग्णालयातील तज्ञांकडुन व्यक्त करण्यात आले आहे. परंतु, पालिकेकडुन पुरेसे लसीकरण होत नसल्याचे सुत्राकडुन सांगण्यात आले. शहरात पालिकेचे ९ प्राथमिक आरोग्य केंद्रांसह प्रत्येकी १ उपकेंद्र, फिरता दवाखाना व दोन रुग्णालय सुरु आहेत. यात दररोज शेकडो रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात. त्यात सुमारे १० ते १२ रुग्ण श्वानदंशावरील उपचारासाठी येत असतात. परंतु, गेल्या आठवड्यापासून आरोग्य विभागाकडे श्वानदंशावरील लसच उपलब्ध नसल्याने रुग्णांना नाईलाजास्तव जास्त रक्कम मोजून खाजगी रुग्णालयात उपचारासाठी धाव घ्यावी लागत आहे. पालिकेकडुन हि लस मोफत दिली जात असुन खाजगी रुग्णालयात मात्र हिच लस सुमारे ४०० रुपयांहून अधिक रक्कम उकळून दिली जाते. शहरातील सुमारे ३ हजार ७५० व्यक्तींना दरवर्षी श्वानदंश होतो. प्रत्येक रुग्णाला आवश्यकतेनुसार ३ ते ५ लस देणे गरजेचे असल्याने आरोग्य विभागाकडुन दरवर्षी सुमारे १५ हजार लस खरेदी केल्या जातात. आपात्कालिन परिस्थितीत आरोग्य विभागाला ५० हजार रुपयांपर्यंतच्या खरेदीचे अधिकार देण्यात आले असले तरी त्यातून इतर अत्यावश्यक वैद्यकीय साहित्य व औषधेदेखील खरेदी करावी लागतात. मागील काही महिन्यांत श्वानदंशावरील लसीचा तुटवडा जाणवू लागताच आरोग्य विभागाने तात्पुरत्या स्वरुपात लसी खरेदी केल्या होत्या. परंतु, खर्चाची मर्यादा संपुष्टात आल्याने लस खरेदी लालफितीत अडकली आहे. हा प्रकार गेल्या जून २०१७ पासून सुरु असुन यंदा तर लसच उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. तसेच काही आवश्यक औषधे देखील प्रशासकीय मान्यतेअभावी उपलब्ध नसल्याचे उजेडात आल्याने रुग्णांवर नाईलाजास्तव पालिकेपेक्षा खाजगी रुग्णालयाच बरे म्हणण्याची वेळ आली आहे. याबाबत पालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रभारी मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पडवळ यांनी सांगितले कि, जून २०१७ मध्ये तत्कालिन आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी श्वानदंशावरील लस खरेदीच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती. परंतु, पालिका निवडणुका लागू झाल्याने लस खरेदीच्या आर्थिक प्रस्तावाला स्थायीची मान्यता मिळू शकली नाही. ती आॅक्टोबर २०१७ मध्ये मिळाल्याने लस खरेदीची निविदा प्रक्रीया पुर्ण करुन ६ महिने पुरतील एवढ्या लसींची आॅर्डर देण्यात आली आहे. लवकरच त्या उपलब्ध होणार आहेत.