लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : भिवंडी शहर महानगरपालिकेस राज्य सरकारने लस उपलब्ध केलेली आहे; मात्र लसीकरणाच्या योग्य नियोजनाअभावी शहरात ज्येष्ठ महिला व नागरिकांसह अनेकांना टोकन देऊनही लस मिळाली नाही. लस मिळेल या प्रतीक्षेत नागरिक बराच वेळ लसीकरण केंद्रांवर वाट पाहत होते; परंतु अनेकांना लस न घेताच घरी परतावे लागले. एका केंद्रावर वाढता गोंधळ पाहता सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनाही बोलावले होते. एकूणच भिवंडीत लसीकरण मोहिमेचा फज्जा उडाला.
भिवंडीत लसीकरण केंद्रांवर युवकांसह महिला व ज्येष्ठ नागरिक गर्दी करीत आहेत. शनिवारी पालिकेच्या वतीने केंद्रांवर योग्य नियोजन झाले नाही. त्यामुळे टोकन वाटप केलेले असतानाही अचानक लस संपली, असे सांगण्यात आले व लसीकरण केंद्रांवर गोंधळ उडाला. शहरातील इदगाह रोड आरोग्य केंद्र, मिल्लतनगर, नवी वस्ती व खुदाबक्ष हॉल येथे लसीकरण कार्यक्रम होत आहे. ऑनलाइन रजिस्ट्रेशन तर आहेच; पण ऑफलाइनद्वारे लसीकरणासाठी सकाळी आठ वाजता अनेकजण उपस्थित होते. मात्र सकाळी ९.१५ वाजता सुरू झालेल्या लसीकरणाचे योग्य नियोजन केले नाही. परिणामी केंद्रात गोंधळ उडाला होता आणि इदगाह केंद्रात सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांना बोलावले.
महापालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांची बदली झाल्याने आता पालिकेत आयुक्त हजर नाहीत, तर शनिवारी-रविवारी सुट्टी असल्याने सर्व अधिकारी वर्ग सुट्टीची मजा घेत आहेत, त्यामुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी गेलेले नागरिक करीत आहेत. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी या प्रकरणी लक्ष घालून चौकशी करावी, अशी मागणी ज्येष्ठ नगरसेवक नीलेश चौधरी यांनी केली आहे.
दरम्यान, ‘महापालिकेकडे असलेला सर्व लससाठा संपत आला आहे, त्यामुळे हा गोंधळ उडाला. याबाबत चौकशी केली जाईल,’ अशी प्रतिक्रिया महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. आर. खरात यांनी दिली आहे.