ठाणे : महापालिकांमध्ये लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने गुरुवारी नागरिकांनी ठाणे जिल्हा विठ्ठल सायन्ना शासकीय रुग्णालयात धाव घेतली होती. यावेळी रुग्णालय प्रशासनाने आलेल्या प्रत्येकाचे लसीकरण केल्याने रुग्णालयातील कोव्हॅक्सिनचा साठा संपल्यामुळेच शुक्रवारी लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आले. कोव्हॅक्सिनचा साठा शुक्रवारी रात्रीपर्यंत येईल, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. त्यातच नेहमी सुरू असणारे लसीकरण केंद्र बंद पाहून नागरिकांना आलेल्या पाऊली परतावे लागले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णालयातील बेडची संख्या काही दिवसांपासून अपुरी पडत आहे. रुग्णांना ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा आहे. अशातच व्यापक प्रमाणात लसीकरण व्हावे, यासाठी शासन नागरिकांना लसीकरण करण्याचे आवाहन करत आहे. मात्र, लसींच्या अपुऱ्या साठ्यामुळे ठाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी लसीकरण मोहिमेला ब्रेक लागल्याचे चित्र आहे. मात्र, जिल्हा शासकीय रुग्णालयात लसीकरण केंद्र महिनाभरापासून सुरू होते. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांनी लसीकरण केंद्रांच्या संख्येत लक्षणीय घट केल्याने नागरिकांनी आपला मोर्चा शासकीय रुग्णालयाकडे वळवला. गुरुवारी अचानक लसीकरणासाठी गर्दी वाढल्याने रुग्णालय प्रशासनाने वेळीच खबरदारी घेत तत्काळ तीन केंद्रांची उभारणी करून लसीकरण सुरू ठेवले. गुरुवारी जवळपास दीड हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात लसींचा साठा संपल्याने येथील केंद्र बंद ठेवण्यात आले आहे. दरम्यान, अनेक दिवसांपासून कर्मचाऱ्यांची ओढाताण हाेत असल्यामुळे त्यांना सुट्टी मिळावी म्हणून केंद्र बंद ठेवल्याचे ही बोलले जात आहे.
काेट
कोव्हॅक्सिनचा साठा संपल्याने शुक्रवारी लसीकरण केंद्र बंद ठेवले आहे. दुपारी किंवा रात्रीपर्यंत लसींचा साठा उपलब्ध होईल. तसेच काही दिवसांपासून सातत्याने रुग्णालयातील लसीकरण सुरू होते. साठा उपलब्ध झाल्यावर केंद्र उद्या सुरू होईल.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे.