ठाणे : कोविड- १९ प्रतिबंधात्मक उपाययोजनेतंर्गत ठाणे शहरात लसीकरण मोहीम यशस्वीरित्या सुरू आहे. कोविड 19 च्या काळात सर्व यंत्रणांबरोबर पोलीस देखील आपली सेवा अत्यंत चांगल्या रितीने बजावत आहेत. यात अनेक पोलीसांना कोविडची लागण झाल्याने त्यांना प्राणही गमवावे लागले आहे. 24 तास सेवा देणाऱ्या पोलीसांच्या कुटुंबियासाठी ठाणे शहरातील पोलीस वसाहतींमध्ये लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी सभागृह नेते अशोक वैती यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे केली आहे.
ठाणे शहरात सद्यस्थितीत लसीकरण मोहीम चांगल्या पध्दतीने सुरू आहे. आजपर्यत सव्वा तीन लाखाहून अधिक नागरिकांचे लसीकरण देखील झाले आहे. ठाणे महापालिकेच्या विविध आरोग्य केंद्रावर लसीकरण सुरू आहे, त्याच पध्दतीने ठाणे महानगरपालिका हद्दीतील सर्व पोलीस वसाहतीमधील पोलीसांच्या कुटुंबाकरिता लसीकरण केंद्र सुरु करावे, जेणेकरुन पोलीसांच्या कुटुंबियांना ते वास्तव्यास असलेल्या ठिकाणी जावून लस घेता येईल. लसीकरणासाठी आवश्यक असलेल्या सर्व साधनसामुग्रीसह व्यवस्था करुन कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र सर्व पोलीस वसाहतीमध्ये सुरू करण्याचे आदेश सभागृह नेते वैती यांनी प्रशासनाला दिले आहेत.
पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर म्हणून अनेक पोलीसांनी आपले लसीकरण करुन घेतले आहे. परंतु त्यांच्या कुटुंबियांचे अजून लसीकरण झालेले नाही. यासाठी पोलीस वसाहतीमध्ये लसीकरण केंद्र सुरू केल्यास त्याचा निश्चितच फायदा होईल, असेही वैती यांनी नमूद केले आहे.