बदलापूरमधील शासकीय लसीकरण केंद्रे अनेकदा बंदच असतात. या लसीकरण केंद्रांवर लस असतानाही प्रशासनाच्या नियोजनाअभावी अनेक नागरिकांना लस न घेताच माघारी परतावे लागल्याच्या घटना अनेकदा घडत आहेत. तसेच मागील महिन्यात शासकीय लसीकरण केंद्रांवर राजकीय वशिलेबाजांचा सुळसुळाट वाढला होता. याबाबत तक्रारी झाल्यानंतर वशिलेबाजांवर आळा घालण्यात पालिकेला यश आले होते. मात्र, आता काही दिवसांपासून लसीकरण केंद्र बंद असल्याने सामान्य नागरिकांना माघारी परतावे लागत आहे. शहरात अनेक राजकीय पक्षांनी सशुल्क लसीकरण शिबिर राबविण्यास सुरुवात केल्याने शासकीय लसीकरण केंद्रांवर लस मिळत नसल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. याबाबत पालिका अधिकाऱ्यांना विचारले असता शासनाकडून नियमित पुरवठा होत नसल्याने लसीकरण केंद्र बंद असल्याचे सांगितले.
अंबरनाथमध्येही हीच परिस्थिती निर्माण झाली असून, छाया रुग्णालय आणि पालिकेमार्फत सुरू असलेल्या ऑर्डनन्स रुग्णालयातील लसीकरण केंद्रही बंद ठेवण्यात आले आहे. लसींचा पुरवठा होत नसल्याने पालिकेवर ही नामुष्की आली आहे.
--------------