लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : पूर्वेतील पाथर्ली येथील केडीएमसीच्या डॉ. आचार्य भिसे शाळेतील बंद झालेले लसीकरण केंद्र तसेच लसीअभावी दोन खाजगी रुग्णालयांतील लसीकरणही बंद असल्याने पश्चिमेतील मनपाच्या शास्त्रीनगर रुग्णालयात गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. अपेक्षेप्रमाणे तेथे शुक्रवारी सकाळी ७ वाजता लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली. मात्र, रुग्णालय व्यवस्थापनाने ऑनलाइन नोंदणी करून तारखेनुसार आलेल्या १४० नागरिकांना प्राधान्य दिले. त्यामुळे तेथे दिवसभर शिस्तबद्ध आणि नियोजनानुसार लसीकरण पार पडले.
लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी न करताच आलेल्या नागरिकांना रुग्णालयात न थांबण्याचे आवाहन रुग्णालय व्यवस्थापनाने केले. त्यामुळे सकाळी अल्पावधीत गर्दी कमी झाली. ऑनलाइन नोंदणी केलेल्यांपैकी १०० जणांना दुपारी दीड वाजेपर्यंत, तर उर्वरित ४० जणांना त्यानंतर लस देण्यात आली. त्यानंतर, थेट आलेल्या नागरिकांना त्यांचे वय, ऑनलाइन नोंदणीत येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन दुसऱ्या सत्रात ६० जणांनाही सायंकाळी ५ वाजेपर्यंत लस देण्यात आली. दिवसभरात सोशल डिस्टन्सिंग व सर्व नियम पाळून २२० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
दरम्यान, नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागू नये, यासाठी पहिल्या मजल्यावर सोशल डिस्टन्सिंग पाळून आसनव्यवस्था केली होती. दुपारच्या दुसऱ्या सत्रातील नागरिकांना घरी जाऊन जेवण करून दुपारी २ वाजल्यानंतर येण्याचे आवाहन करण्यात आले.
-------------
पूर्वेतील महापालिकेचे लसीकरण केंद्र गुरुवारपासून बंद झाल्याची शक्यता लक्षात घेऊन शुक्रवारचे नियोजन केले होते. परिणामी, लसीकरण सुरू झाल्याच्या दिवसांसारखेच सकाळी ७ च्या सुमारास सुमारे ३०० नागरिक लसीकरण व्हावे, या उद्देशाने आले होते. परंतु, त्यांना नियम सांगितल्यावर आणि परत येण्याचे आवाहन केल्यावर दिवसभर सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत लसीकरण शिस्तबद्ध, नियोजन पद्धतीने शांततेत झाले.
- डॉ. सुहासिनी बडेकर, वैद्यकीय अधिकारी, शास्त्रीनगर हॉस्पिटल
-----------