कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने बुधवारपासून मोबाईल व्हॅनमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणास सुरुवात केली आहे. त्याचा प्रारंभ महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतीभा पानपाटील, वैद्यकीय अधिकारी वैशाली काशीकर, आदी उपस्थित होते. मोबाईल व्हॅनमध्ये लसीकरणासाठी चार बस घेण्यात आल्या आहेत. एका बसमध्ये लसीकरण, तर दुसऱ्या बसमध्ये लस घेणाऱ्यास निरीक्षणासाठी ३० मिनिटांसाठी बसवून ठेवले जाईल.
मनपा हद्दीतील चाळवजा आणि झोपडपट्टी भागात लसीकरण कमी झाले आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी मनपाने मोबाईल व्हॅनद्वारे फिरते लसीकरण सुरू केले आहे. सुरुवातीला चार बसमध्ये लसीकरण सुरू झाले असले तरी लोकांचा प्रतिसाद पाहून त्याचे प्रमाण वाढविले जाईल, अशी माहिती सूर्यवंशी यांनी दिली आहे. आतापर्यंत मनपा हद्दीतील तीन लाख ७५ हजार जणांचे लसीकरण झाले आहे. मोबाईल व्हॅनमधील लसीकरणास पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास ७०० जणांनी या मोबाईल व्हॅनमध्ये लसीचा डोस घेतला. ‘आय’ प्रभाग कार्यालयांतर्गत जाईबाई विद्या मंदिर, साईनगर येथे लसीकरण करण्यात आले. उपायुक्त सुधाकर जगताप, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप निंबाळकर, डॉ. पूर्वा भानुशाली या ठिकाणी उपस्थित होते.
१५० माथाडी कामगार झाले लसवंत
कल्याणमधील कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगारांचे लसीकरण बुधवारी महात्मा फुले आरोग्य केंद्रात करण्यात आले. तेथे दिवसभरात १५० माथाडी कामगारांनी लस घेतली आहे.
-----------------------