ठाणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ठाण्यात लसीचा तुटवडा जाणवत होता. त्यामुळे वीकेंड लॉकडाऊनचे कारण देऊन लसीकरण बंद ठेवले होते. त्यानंतर ५६पैकी केवळ २८ लसीकरण केंद्रांवरच सोमवारी लसीकरण सुरू असल्याचे दिसून आले, तर उर्वरित लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या सुत्रांनी दिली. त्यामुळे ठाणेकरांची लसीकरणासाठी तारेवरची कसरत सुरू असल्याचे सोमवारीही दिसून आले.
जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला. लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर फ्रंटलाईन वर्कर्स, आरोग्य विभागातील डॉक्टर्स, कर्मचारी यांना लस देण्यास सुरुवात केली. त्यावेळी विविध संस्थांनी केलेल्या मागणीनुसार लसींचे डोस उपलब्ध करून देण्यात येत होते. त्यानुसार ६० वर्षे वयोगटापुढील आणि आता ४५ वर्षे वयोगटापुढील नागरिकांना लस दिली जात आहे. ठाणे महापालिका हद्दीतील नागरिकांना लस मिळावी, या उद्देशाने ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ४५ ठिकाणी, तर खासगी रुग्णालयाच्या माध्यमातून ११ ठिकाणी लसीकरण सुरू झाले आहे. त्यानुसार शहरातील ५६ केंद्रांवर लसीकरण केले जात होते. परंतु, आता लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने ठाणे महापालिकेच्या २८ केंद्रांवरच सोमवारी लसीकरण सुरू असल्याची माहिती समोर आली. उर्वरित लसीकरण केंद्र बंद ठेवली होती. त्यामुळे जी केंद्र सुरू होती, त्याठिकाणी लसीकरणासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसत होते.
दरम्यान, ठाणे महापालिकेला सोमवारी दुपारी १५ हजार लसींचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यानुसार आता मंगळवारपासून पुन्हा सर्व केंद्रांवर लसीकरण सुरू होईल, असे महापालिकेच्या वतीने स्पष्ट केले आहे. शुक्रवारपर्यंत ठाण्यात दोन लाख हजार हजार १७६ जणांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली. यामध्ये ६० वर्षांपुढील ९० हजार ८२३ जणांचे, तर ४५ वर्षांपुढील ४७ हजार ५७४ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. दरम्यान, ठाणे महापालिकेकडे कोव्हॅक्सिनचा अवघा चार हजार २६० इतका लसींचा साठा उपलब्ध आहे. तर कोव्हीशिल्डचा पाच हजार २३० एवढा साठा शिल्लक होता. अजून १५ हजार लसी मिळाल्या आहेत.