ठाणे : एकीकडे लसींचा तुटवडा असताना आता दुसरीकडे काही खाजगी रुग्णालयातून देखील लसीकरण मोहीम सुरू झाली असून त्याचे स्लॉटदेखील फुल्ल होऊ लागले आहेत; परंतु प्रत्येक रुग्णालयात लसीकरणाचे दर वेगवेगळे असल्याचे दिसून आले आहे. कोविशिल्डसाठी कुठे ७०० ते कुठे ९०० रुपये आकराले जात आहेत. तर कोव्हॅक्सिनसाठी थेट बाराशे रुपये घेत असल्याची माहिती समोर आली आहे.
मागील काही दिवसांपासून लसीकरणाचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे ठाण्यासह इतर ठिकाणी लसीकरणासाठी गर्दी होताना दिसत आहे; परंतु आता ही गर्दी येत्या काही दिवसांत कमी होण्याची चिन्हे आहेत. त्याचे कारणही तसेच आहे. खाजगी रुग्णालयांनादेखील आता पुन्हा लस उपलब्ध होऊ लागली आहे. शनिवारी मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील रुग्णालयातून लसीकरणासाठी स्लॉट बुकिंग सुरू झाल्याचे दिसत होते; परंतु खाजगी रुग्णालयांनी लसींचे दर आता वेगवेगळे आकारण्याचे निश्चित केल्याचे दिसत आहे. काही रुग्णालयात कोविशिल्डची लस ही ७०० रुपयांना तर काही ठिकाणी ७५०, ८५० तर काही ठिकाणी ९०० रुपये आकारले जात आहेत; परंतु शासकीय केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी नागरिकांनी खाजगी रुग्णालयातील स्लॉट बुक केल्याचे दिसत आहे. कोव्हॅक्सिनसाठी तर बाराशे रुपये आकारले जाणार आहेत.
आधीच कोरोनामुळे अनेकांचे कंबरडे मोडले आहे, त्यात आता लसीकरणासाठी खाजगी रुग्णालयाकडून वेगवेगळे दर निश्चित करण्यात येत असल्याने लस कशी घ्यायची, असा पेच नागरिकांना पडला आहे; परंतु ज्याच्या खिशाला परवडेल त्यांनी घ्यावी असेही आता सांगितले जात आहे. यापूर्वी खाजगी रुग्णालयात कोविशिल्डची लस २५० रुपयांना मिळत होती; परंतु आता ज्यांनी पहिला डोस घेतला असेल त्यांना दुसऱ्या डोससाठी ७०० ते ९०० रुपये मोजावे लागणार आहेत, तर ज्यांनी पहिलादेखील डोस अद्याप घेतलेला नाही, त्यांच्यासाठी जास्तीचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्यामुळे शासनाने किमान लसीकरणाचे दर हे समान ठेवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.