लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही लसीकरण मोहीम जोमाने सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेली जनजागृती आणि प्रबोधनामुळे ग्रामीण भागातील नागरिक लसीकरणासाठी सरसावू लागले असून, ग्रामीण भागातील शासकीय आणि खासगी केंद्रांवरील लसीकरणाने पाच लाखांचा टप्पा पार केला आहे.
ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात जानेवारी महिन्यात लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली. वारंवार मोहिमेला ब्रेक लागले. परंतु जेव्हा जेव्हा लस उपलब्ध होती, तेव्हा लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले. दुसरीकडे, ग्रामीण भागात लसीकरण मोहिमेप्रती उदासीनता दिसली. याची गांभीर्याने दखल घेत, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, कल्याण आणि भिवंडी या ग्रामीण भागात आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबवली. या मोहिमेसह प्रबोधनामुळेही ग्रामीण भागातील नागरिक लसीकरणासाठी पुढे सरसावत आहेत. त्यात जानेवारी ते १ सप्टेंबर २०२१ या कालावधीत पाच तालुक्यात शासकीय आणि खासगी लसीकरण केंद्रांवर पाच लाखांचा टप्पा पार करण्यात यश आले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मागील आठ महिन्यात पाच लाख ४५ हजार ५८४ जणांनी पहिला डोस घेतला असून, एक लाख ७६ हजार ५०० जणांचे दोन्ही डोस पूर्ण झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.
लसीकरणाचे गट - पहिला -डोस दुसरा डोस
आरोग्य कर्मचारी - १६२४८ - १२३६२
फ्रंटलाईन वर्कर - ३०४६८ - १९४४१
४५ ते ६० वयोगट - १४९२०५ - ७४१९०
६० वर्षांवरील - ८८४५१ - ५३२६७
१८ ते ४४ वयोगट - २६१२१२ - १७२४०