ठाणे : प्रामाणिकपणे महापालिकेचा हजारो रुपयांचा कर भरणाऱ्या गृहसंकुलांमध्ये लसीकरणाच्या विनंतीला महापालिका प्रशासनाकडून ‘वाटाण्याच्या अक्षता’ दाखविल्या गेल्या. मात्र, चंदनवाडीतील शिवसेना शाखेत लसीकरण शिबिर घेण्यास महापालिकेने कोणत्या आधारावर परवानगी दिली, असा सवाल भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी विचारला आहे. कुपन पळवापळवी होत असताना, आता शिवसेनेने संपूर्ण लसीकरण शिबिर आम्हीच केल्याचे भासविले. ही ‘बनवाबनवी’ महापालिकेला मान्य आहे का, असा सवाल त्यांनी केला आहे.
महापालिकेने केवळ खासगी हॉस्पिटलला सोसायट्यांमध्ये लसीकरण शिबिर घेण्यास परवानगी दिली आहे. ठाण्यातील शेकडो गृहसंकुलांकडून महापालिकेकडे मोफत लसीकरण शिबिर घेण्याची मागणी केली जात होती. यासंदर्भात पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे १५ मे रोजी मागणी केली होती. मात्र, त्याची दखल घेतली नाही. मात्र, अचानकपणे शिवसेनेच्या चंदनवाडी शाखेमध्ये महापालिकेने शिबिर भरविले. या शिबिराला शिवसेना नेत्यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. महापालिकेची यंत्रणाही शिवसेनेच्या नेत्यांच्या आदेशावर काम करीत होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
लस केंद्र सरकारची, अन् झेंडे शिवसेनेचे!
केंद्र सरकारकडून ठाणे महापालिकेला लस पुरविण्यात आली आहे. केंद्र सरकारच्याच लसीच्या जिवावर चंदनवाडी येथील शिवसेना शाखेमध्ये लसीकरण पार पडले. ‘लस सरकारची, अन् झेंडे शिवसेनेचे’ असा प्रकार घडला. शिवसेनेनेच मोफत लस वाटल्याचा देखावा करण्यात आला. मात्र, त्याला सामान्य ठाणेकर भुलणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
----------------------
कोपरी पुलाच्या तड्यांचा विसर!
कोपरी पुलाच्या कामावेळी गर्डर ठेवताना शिवसेनेने इव्हेंट केला होता. त्यावेळी शिवसेनेच्याच एका लोकप्रतिनिधीने व्हिडिओ बनवून माझ्याच प्रयत्नाने पूल उभारत असल्याचा देखावा केला. मात्र, आता पुलाला तडे पडल्यावर तो लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प आहे. आता पुलाच्या निकृष्ट कामाची जबाबदारीही त्यांनीच घ्यायला हवी, अशी टीकाही त्यांनी केली.