ठाणे : कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय सध्यातरी मानला जात आहे; परंतु, लसींचा अपुरा साठा येत असल्याने लसीकरण मोहीम पूर्ण कशी करायची, असा पेच शासकीय यंत्रणेला सतावत आहे. परंतु जसजसा तो साठा उपलब्ध होत आहे, त्यानुसार लसीकरण केंद्रे कमी, अधिक प्रमाणात सुरू ठेवली जात आहेत. त्यानुसार सोमवारी शहरात दोन केंद्रच सुरू होती; परंतु मंगळवारी मात्र शहरात २२ केंद्रांवर लसीकरण सुरू होते. यामध्ये ग्लोबलला दोन हजार, तर महापालिकेच्या इतर केंद्रांवर कुठे ९०, तर कुठे ५० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
लसीकरण केंद्रांवरील गर्दी कमी करण्यासाठी ठाणे महापालिकेने केंद्र शासनाच्या आदेशानुसार ऑनलाइन लस नोंदणीप्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, अवघ्या काही मिनिटांत क्षमतेइतकी नोंदणी पूर्ण होत असल्यामुळे अनेकांना लसीकरणासाठी वेळ मिळत नसून त्यांच्या पदरी निराशा येत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसमोर ऑनलाइन नोंदणीचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. मात्र, महापालिकेने काही ठिकाणी ऑफलाइन केंद्र सुरू ठेवल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून लसतुटवड्यामुळे या मोहिमेत अडचणी निर्माण होत असल्याने केंद्र शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील पालिका आणि खासगी रुग्णालयांनी लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी बंधनकारक केली आहे. सुरुवातीला ही नोंदणीप्रक्रिया किती वाजता सुरू होते, याविषयी नागरिक अनभिज्ञ होते. त्यामुळे तिची वेळ ठरवून देण्याची मागणी होत होती. त्यानुसार, ठाणे महापालिकेने सांयकाळी पाचची वेळ निश्चित केली आहे.
दरम्यान, सोमवारी शहरात अवघी दोनच केंद्रे सुरू होती, तर मंगळवारी शहरातील २२ केंद्रांवर लसीकरण सुरू होते. यामध्ये ग्लोबलमध्ये १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस दिली गेली. दिवसभरात सुमारे दोन हजार नागरिकांचे लसीकरण केल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. तर इतर २० केंद्रांवर ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी पहिला आणि दुसरा डोस दिला जात होता. त्यानुसार प्रत्येक केंद्रावर ५० ते ९० लसी दिवसभरात दिल्या गेल्या.