लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : शहरात लसींचा अपुरा साठा असल्याने नागरिकांना सुरुवातीपासूनच लसीकरणासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. सुरुवातीला शहरात नागरिकांनी लसीकरणाला हवा तसा प्रतिसाद दिला नव्हता. त्यानंतर मनपा प्रशासनाने रविवार व सुटीच्या दिवशीही लसीकरण मोहीम सुरू केली त्याचबरोबर शहरात सुमारे दहा ठिकाणी लसीकरण केंद्र उभारल्याने नागरिकांनी लसीकरण मोहिमेस प्रतिसाद दिला. त्यानंतर शहरात लसींचा साठा अपुरा पडायला लागल्याने मनपा प्रशासनाने आठ लसीकरण केंद्रे बंद ठेऊन इंदिरा गांधी व खुदाबक्ष हॉल या दोन ठिकाणीच लसीकरण केंद्र सुरू ठेवले. या दोन ठिकाणी ४५ वर्षांहून अधिक वय असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. दोनच केंद्रांवर लसीकरण होणार असल्याने नागरिकांना लसीकरणासाठी पुन्हा नव्याने कसरत करावी लागत आहे. दोनच लसीकरण केंद्र असल्याने आता या दोन्ही लसीकरण केंद्रांवर नागरिकांच्या मोठ्या रांगा लागत आहेत.
त्यातच आता १८ वयोगटापासून लसीकरणास राज्य सरकारने मंजुरी दिल्याने शहरात लसीकरण केंद्रे वाढविणे आवश्यक असतानाही शहरात १८ ते ४४ वयोगटासाठी इंदिरा गांधी रुग्णालय नागरी आरोग्य केंद्र व भाग्यनगर कामतघर नागरी आरोग्य केंद्र याठिकाणी केवळ दोनच केंद्रे मनपाने सुरू ठेवली असून ऑनलाइन नोंदणी केलेल्या १८ वर्षांवरील तरुणांसह नागरिकांना आता लस दिली जाणार आहे. मनपाच्या या ऑनलाइन नोंदणीमुळे नागरिकांचा मोठा गोंधळ उडाला आहे.
---------------------------------------------------------
कामगार तंत्रज्ञानाबाबत अनभिज्ञ
भिवंडी हे कामगार व यंत्रमाग मजुरांचे शहर असल्याने येथे ऑनलाइन नोंदणीबाबत नागरिक तितकेसे सजग नाहीत. त्यामुळे ऑनलाइन नोंदणी शहरातील किती नागरिक करतील हाही मोठा यक्ष प्रश्न आहे. त्यातच शहरात अनेक नागरिक लसीकरणाबाबत आजही गैरसमज बाळगत असल्याने शहरात हवा तसा लसीकरणाला नागरिक प्रतिसादही देत नाही हेही सत्य नाकारता येत नाही.