ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना कोरोना लसीकरण मोहीम लसींचा साठा संपल्याने शुक्रवारी थांबली. गुरुवारी (दि. २२) ठाणे महापालिकेला मिळालेल्या लसींपैकी केवळ ८० लसींच्या कुप्या शिल्लक असल्याने शुक्रवारी लसीकरण ठप्प झाले होते. शुक्रवारी संध्याकाळी जिल्ह्यासाठी ५० हजार कोव्हीशिल्ड लसींचा साठा प्राप्त झाला. त्यामुळे शनिवारी पुन्हा लसीकरण सुरू होईल. मात्र केंद्रे कमी प्रमाणात सुरू असतील.
दिवसेंदिवस कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णालयातील बेड्सची संख्या अपुरी पडत आहे. रुग्णांना ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनसाठी अनेक औषधालयांचे उंबरठे झिजवावे लागत असल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात व्यापक प्रमाणात लसीकरण व्हावे, यासाठी शासनाकडून आवाहन केले जात आहे. असे असताना, दुसरीकडे मात्र, लसींच्या अपुऱ्या साठ्यामुळे शुक्रवारी ठाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी लसीकरण मोहिमेला ब्रेक लागल्याचे चित्र दिसून येत आहे. ठाणे जिल्ह्यात गुरुवारी उपलब्ध असलेल्या ५६ हजार लसींच्या साठ्यातून लसीकरण मोहीम राबविण्यात आली. मात्र, शुक्रवारी लसींचा साठ उपलब्ध न झाल्याने लसीकरण मोहिमेला ब्रेक लागल्याचे दिसून आले. ठाणे महापलिका आरोग्य विभागाकडे अवघा ८० लसींचा साठा उपलब्ध असून त्यामध्ये कोव्हॅक्सिनचे ३०, तर कोव्हीशिल्डचे ५० डोस उपलब्ध होते. त्यामुळे पालिका प्रशासनाकडून शुक्रवारी अवघ्या पाच लसीकरण केंद्रांच्या माध्यामतून लसीकरण सुरू होते.
चौकट :
ठाणे जिल्ह्याला मिळाल्या ५० हजार लसी -
ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी लसींच्या अभावी लसीकरण मोहिमेला ब्रेक लागल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी जिल्ह्यासाठी ५० हजार कोव्हीशिल्ड लसींचा साठा प्राप्त झाला आहे. यामध्ये ठाणे महापालिकेला १० हजार, कल्याण-डोंबिवलीला सात हजार, उल्हासनगरला चार हजार, मीरा भाईंदरला सात हजार, नवी मुंबईला १२ हजार आणि सिव्हिल आणि ग्रामीण क्षेत्रासाठी १० हजार लसींचा साठा प्राप्त झाला आहे. त्यामुळे शनिवारपासून पुन्हा लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे.
........