ठाणे : जिल्ह्यातील सर्व सहा महापालिका, दोन नगर परिषदा आणि जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात एकूण २५८ केंद्रांवर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण होत असे. आता केवळ महापालिकांच्या सात रुग्णालयांत लसीकरण केंद्रांसह जिल्हा परिषदेच्या सात अशा जिल्ह्यातील अवघ्या १४ केंद्रांवर सोमवारी लसीकरण करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. या केंद्रांवर ३ हजार ५०० च्या जवळपास लसींचा वापर करण्यात येणार आहे.
लसींचा तुटवडा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे उपलब्ध लस लक्षात घेऊन लसीकरण करण्यात येत असल्याचे ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले. जिल्ह्यातील महापालिकांमध्ये अवघे सात लसीकरण केंद्र सुरू राहणार आहेत. त्यासाठी एक हजार ७८९ लसीचा वापर करण्याचे निश्चित केले आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. मनीष रेंघे यांनी स्पष्ट केले. महापालिकांपैकी ठाणे शहरसह मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबईत प्रत्येकी एका ठिकाणी लसीकरण केंद्र आहे. उल्हासनगरला एका केंद्रावर लसीकरण सुरू राहणार आहे. भिवंडीला दोन लसीकरण केंद्र सुरू राहणार आहे. याशिवाय सात लसीकरण केंद्र जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागात राहणार आहेत. यासाठी दीड ते दोन हजार लसींचा साठा शिल्लक आहे.
जिल्हा परिषदेच्या ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी सात आरोग्य केंद्रांवर लसीकरण सुरू राहणार आहे. तरुणांसाठी दिवे अंजूर व शेंद्रुणला लसीकरण आहे. ठाणे सिव्हिल रुग्णालयात गेल्या तीन दिवसांपासून लसीकरण बंद आहे. येथे कोविशिल्ड लसींचा साठा संपलेला आहे. कोव्हॅक्सिनचा साठा थोडा शिल्लक आहे. या कोव्हॅक्सिनचे लसीकरण फक्त गुरुवारी आणि मंगळवारी होत आहे. लसीकरणाचा पुरवठा झाल्यानंतरच सिव्हिलमध्ये लसीकरण सुरळीत होईल, असे येथील आरएमओ डाॅ. अशोक कांबळे यांनी सांगितले.