लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जवळपास सर्वच जिल्ह्यांत लसीकरणाची गती मंदावली आहे. हीच गती कायम राहिल्यास १८ वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण होण्यास दोन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यातील ९९ लाख ४२ हजार ४०७ लाभार्थ्यांपैकी केवळ २३ लाख ३१ हजार १६० जणांचेच आतापर्यंत लसीकरण झाले आहे.
जानेवारी महिन्यापासून लसीकरण मोहीम सुरु झाली आहे. परंतु लसीकरण वेगाने होत आहे, असे चित्र कधीच दिसले नाही. त्यातही जून महिन्यापेक्षा जुलै महिन्यात अर्धेच लसीकरण झालेले आहे. जुलै महिन्यात केवळ २७ दिवसांपैकी केवळ १० दिवसच लसीकरण झाले. अधूनमधून येणाऱ्या पावसामुळे आणि लसींचा साठा उपलब्ध होत नसल्यानेच लसीकरणाचा वेग मंदावला आहे. त्यातही १८ वर्षांपुढील लसीकरण मोहिमेला सुरुवात झाल्यानंतरही त्याला वारंवार ब्रेक लागला आहे. ठाणे जिल्ह्यात १८ वर्षांपुढील लाभार्थ्यांची संख्या ४१ लाख ७५ हजार ८११ एवढी आहे. परंतु आतापर्यंत त्यातील केवळ ३ लाख ९३ हजार १५० जणांचेच लसीकरण झाले आहे. विशेष म्हणजे १८ वर्षांपुढील लाभार्थ्यांचे केवळ ८.६ टक्केच लसीकरण झाले. त्यामुळे लसीकरणाचा वेग अशाच पद्धतीने राहिल्यास त्यांचे लसीकरण पूर्ण होण्यास दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो असे सांगितले जात आहे.
आतापर्यंत झालेले लसीकरण
एकूण संख्या - पहिला डोस - झालेले प्रमाण (टक्के) - दुसरा डोस - झालेले प्रमाण (टक्के)
आरोग्य कर्मचारी - १०६२२ - १०४ टक्के- ६१६४० - ६०
फ्रंट लाईन वर्कर्स - ११८२३८ - १४३ - ५३३४० - ६४
१८ ते ४४ वयोगट - ३५८१५६ - ८.६ - ३४९९४ - ०.८३
४५ ते ५९ - ११२२४३५ - ३८ - ४७६३३५ - १६
ठाण्यात १५८ केंद्रांत सुरू आहे लसीकरण
एकट्या ठाण्यात सध्या १५८ केंद्रांवर लसीकरण मोहीम सुरु आहे; परंतु रोज लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरण कमी प्रमाणात होत आहे. कधी ३ ते कधी ५ हजारांच्या आसपास लस मिळत असल्याने, त्याचे सर्वच केंद्रांवर नियोजन आखले जात आहे. त्यानुसार एक ते दोन दिवस पुरेल एवढाच साठा प्रत्येक महापालिकेला मिळत आहे. त्यातही मागील काही दिवस पाऊस सुरु असताना एक आठवडा लसीकरण मोहिमेला खो बसला होता.
....
पहिलाच डोस मिळेना
मागील जानेवारीपासून लस घेण्याची वाट बघत आहे. परंतु अद्यापही लस घेता आलेली नाही. त्यात मागील आठवडाभर लसीकरण बंद होते. परंतु, त्यानंतर लस घेण्यासाठी गेलो असता, लांबच लांब रांगा बघून पुन्हा घरी परत आलो. त्यामुळे पहिला लस कधी मिळणार असा प्रश्न पडला आहे.
(सतीश कांबळे - तरुण)
शासकीय लसीकरण केंद्रामध्ये लसीकरणाचा अपुरा पुरवठा असल्याने, लस मिळणे आमच्यासारख्या तरुणांना अवघड होऊन बसले आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतरही तासनतास रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे लस घ्यायची कशी असा प्रश्न आम्हाला सतावत आहे.
(रिद्धेश सोनावणे - तरुण)
लसींचा तुटवडा निर्माण होत असल्यानेच लसीकरणाचा वेग मंदावला आहे. लोकसंख्येच्या मानाने लस उपलब्ध होणे अपेक्षित आहे. परंतु लसींचा साठा उपलब्ध होत नसल्याने उपलब्धतेनुसार लसीकरणाचे नियोजन आखले जात असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.