ठाणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ठाण्यासह जिल्ह्यात लसीकरणाचा साठा अपुरा पडू लागला आहे. काही ठिकाणचे केंद्र बंद करून काही ठिकाणी त्यांची संख्या कमी केली आहे. ठाण्यात तर विकेन्ड लॉकडाऊनचे कारण देऊन दोन दिवस लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. वास्तविक, ठाणे महापालिकेकडेदेखील अगदी तुरळक लसींचा साठा आहे. दुसरीकडे ठाणे जिल्ह्यासह रायगड आणि पालघरसाठी कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्डचा अवघा ४१ हजार २०० लसींचा साठा शिल्लक राहिल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. असे असताना जिल्ह्यातील ग्रामीण भागासह काही महापालिकांच्या ठिकाणी लसींचा साठा जवळजवळ संपला आहे.
ठाण्यासह रायगड आणि पालघर जिल्ह्यांत सध्या लसींचा अपुरा साठा असल्याची माहिती समोर आली आहे. ठाण्यासह या जिल्ह्यांनीदेखील लसींचा साठा मिळावा, यासाठी राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. परंतु, अद्यापही तो उपलब्ध होऊ शकलेला नाही. त्यामुळे आता ठाण्यासह या दोन जिल्ह्यांतही लसींचा तुटवडा निर्माण झाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. पालघर जिल्ह्यासह वसई-विरार महापालिका हद्दीत कोव्हॅक्सिनचे अवघे एक हजार ८४० डोस शिल्लक आहेत. येथे कोव्हिशिल्डचा साठा शिल्लक नाही, तर रायगड जिल्ह्यातही कोव्हॅक्सिनचे तीन हजार ६८० आणि कोव्हिशिल्डचा १०० लसींचा साठा उपलब्ध आहे. भिवंडीत कोव्हिशिल्डचे ८०० डोस, ठाणे महापालिका हद्दीत कोव्हॅक्सिनचे २ हजार ६५० आणि कोव्हिशिल्डचे ३० डोस शिल्लक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोव्हॅक्सिनचे ६ हजार ७२० डोस असून, कोव्हिशिल्डचा साठा संपुष्टात आला आहे, तर मीरा-भाईंदरमध्ये कोव्हॅक्सिनचे ५ हजार ५८० डोस शिल्लक आहेत, नवी मुंबईतही कोव्हॅक्सिनचे पंधरा हजार डोस शिल्लक आहेत, तर उल्हासनगरमध्ये कोव्हिशिल्डचे एक हजार १२० डोस शिल्लक आहेत. त्यामुळे येथील अनेक केंद्रे बंद केली आहेत, तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लसींचा साठा संपल्याने येथील लसीकरणाला आता ब्रेक लागल्याचे स्पष्ट झाले आहे.
ठाण्यात दोन दिवस लसीकरण बंद
ठाणे महापालिका हद्दीत शुक्रवारी सायंकाळपासून खासगी रुग्णालयात सुरू असलेल्या लसीकरणाला ब्रेक लागला आहे. काही रुग्णालयांनी शुक्रवारी केवळ ५० जणांचेच लसीकरण केले जाईल, असे स्पष्ट करून तसे फलक लावले होते; तर महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या केंद्रावरदेखील लसीकरण कमी प्रमाणात झाल्याचे दिसत होते, तर काही केंद्रांवर लस घेण्यासाठी गर्दी झाल्याचे चित्र होते. परंतु, लसींचा साठा मर्यादीत असल्याने अनेकांना घरची वाट धरावी लागली. आता लसींचा तुटवडा जाणवत असतानाच विकेंड लॉकडाऊनचे कारण देऊन ठाणे महापालिकेने पुढील दोन दिवस लसीकरण केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. दोन दिवसात साठा उपलब्ध होईल, असा कयास पालिकेमार्फत लावण्यात येत आहे. परंतु तो साठा उपलब्ध झाला नाही, तर मात्र लसीकरण ठप्प होईल, अशी भीतीदेखील प्रशासनाला आहे.