अंबरनाथ : अंबरनाथ शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीचे प्रदूषण कमी होण्याचे चिन्ह दिसत नाही. सर्व सांडपाणी नदीत सोडले जात असतानाच सोमवारी दुपारी अचानक वालधुनी नदीतील पाणी गुलाबी झाले होते.
अंबरनाथमधून वाहणारी वालधुनी नदी गेल्या काही वर्षात सर्वाधिक प्रदूषित नदीत समाविष्ट झाली आहे. गेल्या वर्षी सामाजिक कार्यकर्त्यांनी पालिकेच्या मदतीने नदीच्या पुनरुज्जीवनाचा प्रकल्प राबवला होता. मात्र तरीदेखील नदीचे प्रदूषण कमी झाले नाही. अंबरनाथ आनंदनगर एमआयडीसीतील काही कारखान्यांनी सर्व सांडपाणी या नदीत सोडल्याने आजही नदी प्रदूषितच आहे. यासोबतच अंबरनाथ आणि उल्हासनगरमधील काही जीन्स कंपन्या थेट त्यांचे सांडपाणी नदी सोडत असल्याने या नदीचे रंगदेखील बदलत आहे. सोमवारी दुपारी वालधुनी नदीने गुलाबी रंग परिधान केला होता. संपूर्ण पाणी गुलाबी रंगाचे वाहत राहिल्याने प्रदूषणाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. सांडपाणी, रासायनिक पाणी आणि अनेक जीन्स वॉश करणारे कारखानदारदेखील सर्व सांडपाणी वालधुनी नदीत सोडत असल्यामुळे या नदीच्या पाण्याचा रंग बदलत आहे.
वालधुनी नदीचे प्रदूषण सर्वज्ञात असतानादेखील प्रदूषण नियंत्रण मंडळ त्याकडे उघडपणे डोळेझाक करीत आहे. वालधुनी नदी प्रदूषित होण्यामागे प्रदूषण नियंत्रण मंडळाचा सर्वांत मोठा हात राहिला आहे - शैलेश शिर्के, सामाजिक कार्यकर्ते