ठाणे : प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखला जाणारा लाल गुलाब व्हॅलेंटाइनदिनी महागण्याची शक्यता आहे. सध्या १० रुपये प्रतिनग दर असलेल्या या गुलाबपुष्पासाठी प्रेमदिनी १५ रुपये मोजावे लागू शकतात. या दिनानिमित्त गुलाबाची तब्बल आठ ते दहापट आवक होणार असल्याची माहितीही फुलविक्रेत्यांनी दिली.व्हॅलेंटाइन डे शी गुलाबाचे वेगळेच नाते असते. बुधवारी व्हॅलेंटाइन डे असल्याने तरुणाईमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या दिवशी लालेलाल गुलाबांना तरुणाईकडून चांगलीच मागणी असते. वाढत्या मागणीमुळे दरही वाढवले जातात आणि आवकही. सोमवारपर्यंत गुलाबाचा दर १० रुपये प्रतिनग होता. मंगळवारी आणि बुधवारी तो १५ रुपयांवर जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती फुलविक्रेत्या जयश्री काळे यांनी ‘लोकमत’ला दिली.सध्या दोन-तीन बंडलविक्रीसाठी आणले जातात. एका बंडलमध्ये २० गुलाब असतात; परंतु या दिवशी आठ ते दहापट गुलाबविक्रीसाठी आणले जातील, असे काळे म्हणाल्या. चायनीज गुलाब आणि भारतीय गुलाब असे दोन प्रकारांचे गुलाब असून, या दोन्ही गुलाबांचे दर सारखेच आहेत. टवटवीत, मोठा दिसणारा गुलाब तरुण मंडळी खरेदी करीत असल्याने विक्रेतेही याच गुलाबाकडे आकर्षित होतात.गुलाबांचे बुकेही अनेक जण खरेदी करतात. एरव्ही, हा बुके ६० ते ७० रुपये प्रतिनग मिळतो. परंतु, या दिवशी त्याची किंमत १०० रुपयांपुढे असेल. गुलाबांप्रमाणे विविध गिफ्ट् खरेदी शनिवारपासून सुरु झाली आहे. सध्या तरुणाई खरेदी करत असल्याचे एक व्यावसायिक सुशील गाला यांनी ‘लोकमत’ला सांगितले.साध्या भेटकार्डपेक्षा सध्या क्रिएटिव्ह भेटकार्ड बाजारात आले आहेत.- सोशल मीडियामुळे ग्रीटिंग्जना उतरती कळा आली. तंत्रज्ञानाने प्रगती केली, सोशल मीडियाचा शिरकाव झाला. शिवाय, फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, टिष्ट्वटर ही माध्यमे तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनल्याचा परिणाम भेटकार्डावर झाला. ते विकत घेण्यापेक्षा एक मेसेज पाठवून शुभेच्छा दिल्या जातात. त्यामुळे पुन्हा एकदा भेटकार्डाकडे खेचून आणण्यासाठी व्हॅलेंटाइननिमित्त क्रिएटिव्ह परंतु मोठ्या आकारांचे भेटकार्ड बाजारात आहे. पॉपअपचे भेटकार्ड लक्ष वेधून घेणारे आहे. त्याची किंमत १३०० रुपये आहे. दिवाळीत गिफ्ट्स देण्यासाठी चॉकलेटचे मोठे बॉक्स येतात, त्याचप्रमाणे चॉकलेट स्पेशल कार्ड्स यावेळी आले आहेत. त्यात चार भेटकार्ड आहेत. ते वेगवेगळ्या चॉकलेट, कॅडबरीच्या फ्लेव्हर्समध्ये आहेत. आकारांप्रमाणे याचे दर आहेत. लहान कार्ड ३८० रुपये, तर मोठे कार्ड ४४० रुपये दराने विक्रीसाठी आहेत.
व्हॅलेंटाइनला लाल गुलाब महागणार! प्रत्येक फुलामागे मोजावे लागणार १५ रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 3:26 AM