कल्याण : लोककवी वामनदादा कर्डक हा जनसामान्यांचा आवाज होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची छत्रछाया त्यांना लाभली होती. त्यामुळे हा माणूस आभाळा ऐवढा मोठा होता, असे उद्गार लोककवी वामन कर्डक जन्मशताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष कवी किरण येले यांनी येथे काढले.
कल्याण सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात पु. ल. कट्ट्यातर्फे लोककवी वामन कर्डक यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यास शनिवारपासून सुरुवात झाली. ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांच्या हस्ते या सोहळ्याचा शुभारंभ झाला. याप्रसंगी कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर, कवी प्रशांत मोरे, कायद्याने वागा चळवळीचे अध्यक्ष राज असरोंडकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री वृषाली विनायक यांनी केले.
येले म्हणाले, मी ही रस्त्यावरचा कवी आहे. वामनदादा हेदेखील रस्त्यावरचे कवी होते. ते खऱ्या अर्थाने लोककवी असल्याने त्यांची जन्मशताब्दी रस्त्यावर भरगच्च कार्यक्रम घेऊन साजरी करण्याचे नियोजन होते. तेथे नंदीबैलवाले, वैदू, पोतराज, गोंधळी आदींना घेऊन शुभारंभ करायचा होता. परंतु, कोरोना नियमावली आणि पावसामुळे ते शक्य नाही. मात्र, ही जन्मशताब्दी देशभर पोहोचवायची आहे. वर्षभर वामनदादांच्या साहित्याचा जागर चालवायचा आहे. ऑफलाइन पद्धतीने जमले नाही, तर ऑनलाइन पद्धतीने १० जिल्ह्यांत विविध कार्यक्रम घेतले जाणार आहे. त्याला सगळ्यांची साथ हवी आहे.
म्हात्रे म्हणाले, साहित्यातही बुद्धी आणि श्रम, अशी विभागणी आहे. त्यात श्रमाच्या साहित्याला फारसे महत्त्व दिले गेले नसले तरी वामनदादांचे साहित्य हे जनमानसात रुजलेले आहे.
शुभारंभाच्या कार्यक्रमानंतर कविसंमेलन रंगले. त्यात कवी संदेश ढगे यांनी ‘बादशहा’ ही कविता सादर केली. वामनदादांसारखे कविता करण्याचे धाडस करणे शक्य नसल्याचे ते म्हणाले. घरातील विजेचे बिल जरी जास्त आले तरी आपला आवाज निघत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
विविध कविता सादर
कवी माधव डोळे म्हणाले, वामनदादा हे थेट बाण मारायचे. त्यांच्यासारखी बाण मारणारी गझल त्यांनी सादर केली. कवी आकाश यांनी प्रेमकविता सादर केली. कवी रमेश आव्हाढ यांनी स्वातंत्र्यावरची कविता सादर केली. तर अरुण म्हात्रे यांनी ‘रानाच्या झाडातून जाते माझ्या माहेराची वाट’ ही हळूवार भावना टिपणारी वामनदादांची कविता सादर करून सगळ्यांची दाद मिळविली.
------------------------