लोकमत न्यूज नेटवर्क
आसनगाव : शहापूर तालुक्यात अलीकडे वणवा लागण्याच्या घटनांत वाढ होऊन दोन महिन्यांत २९ ठिकाणी वणवा लागून आगीच्या रौद्ररूपाने शेकडो हेक्टर वनसंपदा नष्ट झाली आहे. वणवे रोखण्यास वनविभाग अपयशी ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे.
चार दिवसांपूर्वी मौजे अजनुप परिसरातील गायदरा या अतिदुर्गम भागातील जंगलातील वणव्यापासून आपल्या शेतीसाठी लागणारा राब वाचविताना दोन आदिवासी महिला व एक बैल या आगीत होरपळून जखमी झाले. आगीत भाजल्याने ही महिला शहापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. या घटनेची साधी माहितीही येथील वनपरिक्षेत्र अधिकारी यांना नसावी ही फारच खेदजनक बाब आहे. मौजे शिरोळजवळील अजनुप - गायदरा येथील आदिवासी शेतकरी बुधी वाख (६५), मुलगा देवराम (३२), सून वनिता (२८), नात कांता (१७) हे पूर्ण कुटुंब शेत राबणीसाठी गवत गोळा करीत असताना वनविभागाच्या राखीव जंगलात वणवा पेटला. वणव्याने अल्पावधीतच आगीचे रौद्ररूप धारण केले. त्या वेळी आपला राब वाचविण्यासाठी या आदिवासींनी प्रयत्न केले असता त्यात बुधी आगीत होरपळत आहे पाहताच सून वनिता सासूला वाचविताना भाजली आहे. या आगीतून दोघींनी शर्थीचे प्रयत्न करीत आपला जीव वाचवला.
या घटनेची माहिती मिळताच माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी जखमींची विचारपूस केली. या आगीत खर्डी वनपरिक्षेत्र हद्दीतील अर्धा हेक्टर क्षेत्र तर खाजगी मालकी हक्कातील २० हेक्टर क्षेत्र जळून खाक झाले, अशी माहिती शहापूर उपवनसंरक्षक वसंत घुले यांनी दिली. शहापूर प्रादेशिक विभागाच्या शहापूर, धसई, डोळखांब, वाशाळा, विहिगाव - कसारा, खर्डी या सहा वनपरिक्षेत्रांतील जंगलास मागील दोन महिन्यांपासून एकूण २९ ठिकाणी वणवे लागल्याच्या घटनेची नोंद आहे.
----------------------------
कोट
वणव्याच्या आगीत होरपळून जखमी झालेल्या या आदिवासी महिलांना वनविभाग व तहसीलदार यांनी नैसर्गिक आपत्तीतून तत्काळ आर्थिक मदत करावी.
- पांडुरंग बरोरा, माजी आमदार
वणव्यात भाजून जखमी झालेल्या महिलांना नैसर्गिक आपत्ती म्हणून मदत मिळू शकते. परंतु वनविभागाकडे अशी कोणत्याही प्रकारच्या सरकारी निधीची तरतूद नाही.
- व्ही. टी. घुले, उपवनसंरक्षक शहापूर