कल्याण-डोंबिवलीच्या एमआयडीसीतील मिलापनगर ही उच्चभ्रू वस्ती. येथे सुमारे सहा हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचा आरक्षित भूखंड पडून होता. त्यावर अतिक्रमणाची चिन्हे दिसत होती. रहिवाशांनी एकत्र येऊन आपल्या खिशांतून पैसे काढून वंदे मातरम् उद्यान उभे करून वेगळा आदर्श उभा केला.कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात उद्यानांची वानवा आहे, त्यात जी उद्याने आहेत त्यांचा खेळखंडोबा झाला आहे. जेथे उद्यानांसाठी आरक्षित भूखंड आहेत, ते अतिक्रमणांच्या विळख्यात सापडले आहेत. महापालिकेची आर्थिककोंडी झाली असताना कचऱ्यासारख्या दैनंदिन नागरी प्रश्नांच्या आव्हानांपुढे उद्यानांकडे लक्ष द्यायला महापालिकेला वेळ नाही. अशी गंभीर परिस्थिती असताना डोंबिवली एमआयडीसीमधील मिलापनगर रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशनच्या पदाधिकाºयांसह रहिवाशांनी एकत्र येत मोकळ्या पण आरक्षित भूखंडावर लाखो रुपये खर्च करून सुसज्ज, सर्व सुविधा उपलब्ध असलेले ‘वंदे मातरम्’ उद्यान साकारले. महागाईच्या काळात देणगी, वर्गणी देणे ही संकल्पना लोप पावत असतानाच सामूहिक वर्गणी काढून मोकळ्या भूखंडाचा कायापालट करण्याचा व तेथे नागरी सुविधा देण्याचा आदर्श रहिवाशांनी घालून दिला. उद्यानाचे काम पूर्ण होताच कोणत्याही सेलिब्रिटीसाठी वेळ न दवडता नागरिकांसाठी असलेल्या त्या उद्यानाचे नागरिकांनीच अलीकडे लोकार्पण केले.रहिवासी संघाच्या उपाध्यक्षा अर्चना पाटणकर यांनी सांगितले की, हे उद्यान साकारण्यामध्ये शोभा कामत कुटुंबीयांचा मोलाचा वाटा असून अन्य रहिवाशांनीही आपापल्या परीने अर्थसाहाय्य केले. २००३ मध्ये एमआयडीसीकडून एक भूखंड रहिवासी संघाने ताब्यात घेतला. त्यानंतर, त्या ठिकाणी फिरायला जायला काही नागरिकांनी सुरुवात केली, पण सोयीसुविधा नसल्याने काही वर्षे तो भूखंड पडून होता. तेथे अतिक्रमण होण्याची दाट शक्यता दिसत होती. मात्र, परिसरातील बंगल्यांसह अन्य रहिवाशांनी एकत्र येत तेथे जाऊन झाडे लावणे, सकाळ-संध्याकाळच्या वेळेत फिरायला जाणे, असा उपक्रम चिकाटीने राबवला. हळूहळू तेथील वर्दळ वाढायला लागली. पण, कसलीच सुविधा नसल्याने नागरिकांची गैरसोय व्हायला लागली. याची जाणीव रहिवासी संघाला आधीपासून होतीच. गेल्या वर्षभरात तेथे सुविधा असाव्यात, ही भावना जास्त वाढीस लागली. २००८-१० मध्ये खासदार निधीतून काही खर्च झाला होता, पण तो पुरेसा नसल्याने फारशी कामे झाली नाहीत.या सगळ्याची नोंद घेत याच परिसरातील जुने रहिवासी-डोंबिवलीकर शोभा कामत, पी. व्ही. कामत यांनी भूखंडाच्या विकासाचा ध्यास घेतला. त्यांच्या परदेशात असलेल्या संजीव कामत व सुचेता पै या दोघा मुलामुलीने सात लाखांचा निधी या मैदानाच्या विकासासाठी दिला. तो विशेष महत्त्वाचा असल्याने नागरिकांमधील उत्साह वाढला. अन्य रहिवाशांनीही आपापल्या ऐपतीनुसार वर्गणी काढली. एकूण साडेआठ लाखांचा निधी उभा राहिल्याचे अर्चना पाटणकर यांनी सांगितले. परिसरातीलच रहिवासी माधव सिंग यांनी स्वत: लक्ष घालून भूखंडावर जॉगिंग ट्रॅक, बॅटमिंटन कोर्ट, ओपन जिम, योग केंद्र आदी उभारले. बघताबघता ५९१७ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या त्या भूखंडाचा कायापालट झाला. रहिवासी संघाचे बंगले, इमारती आदी मिळून सुमारे ३०० कुटुंबीय तेथे वास्तव्याला आहेत. वर्षानुवर्षे ते एकोप्याने राहत असून सामाजिक बांधीलकी जपण्याचा ते सातत्याने प्रयत्न करतात. त्यातूनच हे उद्यान आकाराला आले. पाणी व वीजबिल संघाच्या माध्यमानेच भरण्यात येते.सिंग यांना बांधकामाचा अनुभव असल्याने अत्यंत आपुलकीने आणि विश्वासाने कमीतकमी खर्चात त्यांनी सगळे काम चोख केल्याचे रहिवासी सांगतात. कामाचा दर्जा राखला गेल्याने सर्व वस्तू टिकाऊ आहेत. एक चांगले सामाजिक काम हातून झाल्याचा आनंद रहिवाशांच्या चेहºयावर झळकला आहे.साधारणपणे १९८७-८८ मध्ये ही वसाहत वसली. त्यानंतर, काही वर्षांतच रहिवासी संघाची स्थापना झाली. रहिवाशांनी एकत्र येत अंतर्गत रस्त्यांसाठीही यापूर्वी असाच लढा दिला आहे. परिसरातील प्रदूषणाचा गंभीर प्रश्न ते अनेक वर्षे हाताळत आहेत. त्यासाठी एमआयडीसी, एमपीसीबी, आता महापालिका तसेच मंत्रालयस्तरावर त्यांनी कैफियत मांडली असून संघर्ष पुकारला आहे. या ठिकाणी चोºयांचे प्रमाण वाढले होते, ते अनेकांनी एकत्र येत तातडीने पोलिसांच्या लक्षात आणून दिले. लागलीच चोºयांचे प्रणाम कमी झाले. रहिवासी राहतात तर त्यांना सुविधा मिळायलाच हव्या, असा रहिवाशांचा आग्रह असतो. त्यात कोणावरही अन्याय नको, पण जे हक्काचे आहे, समाजहिताचे आहे, ते व्हायलाच हवे, अशी सगळ्यांची धारणा आहे. आता एप्रिलमध्येच मनोहर चोळकर हे रहिवासी संघाचे नवे अध्यक्ष झाले आहेत. तसेच वर्षा महाडिक, उदय प्रभुदेसाई आदींसह सगळ्यांच्याच प्रचंड इच्छाशक्तीमुळे हे शक्य झाले.
लोकसहभागातून वंदे मातरम् उद्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 5:54 AM