बदलापूर - वांगणीत स्टेशनच्या शेजारी असलेल्या सायडिंग यार्डातून प्रवास करू देण्याची प्रमुख मागणी वांगणीतील विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, सामाजिक संघटना, रेल्वे प्रवासी संघटना यांनी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील रेल्वे मुख्यालयात जाऊन रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली. मात्र, रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ही मागणी अमान्य करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे वांगणीत राहणाºया रेल्वे प्रवाशांना सायडिंगला उभ्या असलेल्या गाडीतून प्रवास करता येणार नाही. दरम्यान, रेल्वेच्या अधिकाºयांनी सायडिंगला असलेल्या लोकलमधून वांगणीकरांना प्रवास करण्यास मज्जाव केल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.रेल्वे अधिकारी तसेच पोलिसांनी रेल्वेच्या या नियमांबाबत वांगणीच्या शिष्टमंडळाला सविस्तर माहिती दिली. यार्डातून प्रवास करणे बेकायदेशीर असल्याचे रेल्वे नियमांमध्ये आहे. हे नियम बदलणे अशक्य असल्याने यापुढे सायडिंग लोकलमधून प्रवास करणाºयांवर पोलीस नियमानुसार कारवाई करतील.शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख एकनाथ शेलार यांच्यासह उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे मनोहर शेलार, सचिन शेलार, संतोष गायकर, अविनाश केवणे, संदीप शाह आदींनी रेल्वे अधिकाºयांची भेट घेऊन वांगणीतील रेल्वे प्रवाशांना भेडसावत असलेल्या विविध समस्यांचे निवेदन रेल्वे अधिकाºयांना दिले. यात वांगणी रेल्वेस्थानकावर संपूर्ण शेड उभारणे, कर्जत दिशेला नवा पादचारी पूल बांधणे. वांगणीत रेल्वे आरक्षण केंद्र सुरू करणे तसेच तिकीट खिडक्यांची संख्या वाढवणे, स्वतंत्र पोलीस चौकी यासह विविध मागण्या रेल्वे प्रवासी संघटनेने केल्या होत्या. यातील अनेक मागण्यांबाबत रेल्वे अधिकाºयांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवल्याचे शिष्टमंडळातील पदाधिकाºयांनी सांगितले. मात्र, रेल्वेने सायडिंगच्या लोकलमधून प्रवास करण्याची प्रमुख मागणी अमान्य केल्याने पुढील काळात स्थानिक खासदार आणि पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन याविषयी अधिक प्रभावी मागणी करणार असल्याचे शिष्टमंडळातील सदस्यांनी सांगितले.
यार्डातून प्रवास करण्यास वांगणीकरांना मनाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 2:42 AM