जितेंद्र कालेकरठाणे: वर्तकनगर येथील ठाणे महापालिकेच्या उद्यानाचे ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब’ असे नामकरण करण्यात येणार आहे. शुक्रवारी होणा-या महासभेत यावर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्यामुळे सर्वात आधी याची मागणी करणा-या मनसेने आणि हा विषय पटलावर घेणा-या शिवसेनेमध्ये आता श्रेयासाठी राजकारण सुरु झाले आहे.वर्तकनगर प्रभाग क्रमांक १७ मधील बिल्डींग क्रमांक ५४ तसेच ५५ च्या पाठीमागे ठाणे महापालिकेचे उद्यान आहे. याच उद्यानाचे स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब असे नामकरण करण्याचा ३०४ क्रमांकाचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावावर महासभेत मंजूरी मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल. सत्ताधारी शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका विमल भोईर यांनी हा प्रस्ताव मांडला असून त्यासाठी त्यांचा पाठपुरावाही सुरु असल्याचा त्यांचा दावा आहे. तर मनसेचे स्थानिक पदाधिकारी संतोष निकम यांनीही त्यासाठी पाठपुरावा केल्यामुळे प्रशासनाला आणि सत्ताधारी शिवसेनेला त्याची दखल घ्यावी लागली, असा त्यांचा दावा आहे. नगरसेविका भोईर यांनी या नामकरणासाठी १४ डिसेंबर २०१६ रोजी तर निकम यांनी २४ नोव्हेंबर २०१६ रोजी पालिकेला पत्र दिले होते. तसा उल्लेखही पालिकेच्या अधिकृत गोषवा-यामध्ये असल्यामुळे मनसेने २४ नोव्हेंबर २०१६ च्या आधीपासून हा पाठपुरावा केल्याचे म्हटले आहे.
‘‘ २०१६ पासून या विषयाचा मी पाठपुरावा करीत आहे. सत्ता आमची आहे. महापौर संजय मोरे यांच्या कार्यकालापासून हा पाठपुरावा सुरु आहे. त्यामुळे याचे खरे श्रेय हे शिवसेनेलाच आहे. ’’विमल भोईर, स्थानिक नगरसेविका, वर्तकनगर, ठाणे.
‘‘ शिवसेनेची सत्ता असूनही २०१५ पासून पाठपुरावा करुनही या उद्यानाला स्वर्गीय आनंद दिघे यांचे नाव दिले गेले नाही. परंतू, २०१५ पासूनच्या पाठपुराव्यामुळे आता या उद्यानाला स्वर्गीय आनंद दिघे यांचे नाव मिळणार असल्यामुळे आम्हाला श्रेयापेक्षा आनंद आहे.’’
या जागेवर काही वर्षांपूर्वी काही स्थानिकांनी अतिक्रमण केले होते. पण स्थानिक नागरिकांनी त्याला जोरदार विरोध केला. त्यावेळी तत्कालीन शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी ही जागा खेळाचे मैदान म्हणून राहिल, अशी ग्वाही दिली होती. याठिकाणी अतिक्रमण करण्यासाठी लावलेले फलकही नागरिकांनी फेकून दिले. स्व. दिघे यांच्यामुळे जागेवरील अतिक्रमण हटविले गेल्यामुळे त्या जागेवरील उद्यानाला धर्मवीर आनंद दिघे साहेब असे नामकरण करण्यात यावे, अशी येथील रहिवाशांचीही अपेक्षा असल्याचे एका जेष्ठ नागरिकाने सांगितले.