भिवंडी: शहराचा ऐतिहासिक वारसा, पर्यटन त्याचबरोबर नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागवणाऱ्या शहरातील वऱ्हाळादेवी तलावावर महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने या तलावाच्या पाण्यावर हिरवा तवंग पसरला असून तलावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. विशेष म्हणजे मनपा आयुक्त निवासाबरोबरच माजी उपमहापौर तसेच नगरसेवकांच्या घराशेजारी असलेल्या या तलावाकडे लोकप्रतिनिधींसह मनपा प्रशासनाचे पुरता दुर्लक्ष झाले आहे . या तलावात पसरलेल्या दुर्गंधीमुले शहरातील नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे.
या तलावातून जुन्या भिवंडी शहरातील मंडई, गौरी पाडा ,वाणी आळी, ब्राह्मण आळी ,सौदागर मोहल्ला ,तांडेल मोहल्ला आदी भागात दररोज ५ एमएलडी पाणी पुरवठा केला जात आहे . त्यातच कोट्यवधींचा खर्च करून या तलावात ठिकठिकाणी विसर्जन घाट बांधण्यात आले आहेत . मात्र सध्या या विसर्जन घाटांची दुरवस्था झाल्याने या विसर्जन घाटासाठी अडविलेल्या पाण्यातील प्रदूषण सर्वदूर पाण्यात पसरल्याने तलावाच्या पाण्यावर हिरवा तेलकट तरंग साचला असून या तलावातील पाण्याला उग्र दर्प येत आहे.
या तलावाच्या दुरावस्थेसंदर्भात आपण नेहमीच आवाज उठवला आहे, मात्र मनपा प्रशासन तात्पुरता तलाव स्वच्छतेचा फक्त दिखावा करत असते.तलावातील हिरवा तवंग काढण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे असून महापालिका प्रशासन फक्त सफाई कर्मचाऱ्याना तलाव सफाईचे काम करण्यास सांगत असत्या त्यांची पातज फिरली की परिस्थिती जैसे थे अशीच असते अशी प्रतिक्रिया स्थानिक रहिवासी ऍड मुकेश नवगिरे यांनी दिली आहे.