लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कृषी योजना पुन्हा जिल्हा परिषदांकडे देण्यासह गट व गणातील सुधारणांसाठी स्थानिक विकास निधी द्यावा, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात पंचायत समिती सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळावा आदी विविध मागण्यांसाठी राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी बारामतीत जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व सर्वेसर्वा शरद पवार, यांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले, असे या असोसिएशनचे जेष्ठ पदाधिकारी व ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार,यांनी लोकमतला सांगितले.
या असोसिएशनच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बारामतीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन ग्रामीण भागात काम करताना येत असलेल्या विविध समस्यांचे कथन ही या पदाधिकाऱ्यांनी केल्याचे पवार यांनी सांगितले. असोसिएशनच्या या राज्यस्तरीय शिष्टमंडळात असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष कैलास गोरे-पाटील, कार्याध्यक्ष उदय बने, उपाध्यक्ष जय मंगल जाधव, सुभाष गोटीराम पवार, प्रतापराव पवार, भारत शिंदे, सुभाष घरत, पुणेचे रणजीत शिवतारे, प्रमोद काकडे, शरद बुट्टे-पाटील, महिला कार्याध्यक्षा अमृता वसंतराव पवार, पांडुरंग पवार, सांगलीचे अरुण बालटे, सोलापूरचे नितीन नकाते, नाना देवकाते आदींचा समावेश असल्याचे पवार यांनी निदर्शनात आणून दिले.
या शिष्टमंडळाने राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यांना दैनंदिन कामकाजात भेडसावणाऱ्या तांत्रिक अडचणी, सदस्यांचे तुटपुंजे मानधनात वाढ करावी, प्रत्येक सदस्यांना गट व गणात सुधारणांसाठी स्थानिक विकास निधी द्यावा, यापूर्वी जिल्हा परिषदेकडे असलेल्या कृषी योजना पुन्हा सुरू कराव्यात, स्थावर मालमत्ता विकसित करण्याचा अधिकार द्यावा, विधान परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून येणारे आमदार हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे मतदार असण्याची अट टाकावी, विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात पंचायत समिती सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळावा, नगर विकास मंत्रालयाने स्वीकारलेल्या २०२१ च्या जनगणनेनुसार ग्रामीण विकास मंत्रालयानेही जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यसंख्येत दहा ते १५ टक्के वाढ करावी आदी मागण्यांचे निवेदन यावेळी पवार यांना या सदस्यांनी दिले. त्यास अनुसरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमवेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी या सदस्यांना दिले. या संघटनेच्या वतीने पुण्यात होणाऱ्या राज्यस्तरावरील पुरस्कार सोहळ्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहण्याची विनंतीही या सदस्यांनी यावेळी केली असता त्या पवार यांनी सहमती दिली.