उल्हासनगर : काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी भेट घेऊन शहरातील विविध समस्यां बाबत चर्चा करून मागणीचे निवेदन दिले. यावेळी आयुक्तांच्या कामाचे कौतुक काँग्रेस शिष्टमंडळाने करून पाणी, साफसफाई, रस्त्याची दुरावस्था, अवैध बांधकाम आदी समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधले.
उल्हासनगर काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शुक्रवारी दुपारी महापालिका आयुक्त अजीज खान यांची भेट घेतली. यावेळी खडी खदान येथील डम्पिंग ग्राउंड रस्त्याची दुरावस्था, कैलास कॉलनी ते कुर्ला कॅम्प व कुर्ला कॅम्प ते भाटिया चौक रस्त्याचे अर्धवट काम, छत्रपती शाहू महाराज उड्डाणपूलाचे स्ट्रक्चर ऑडिट करणे, प्रभाग क्रं-१८ येथे आरोग्य केंद्र सुरू करणे, शहर शून्य कचरामुक्त करणे, रामकिशन करोतियानगर सी ब्लॉक येथील दूषित पाण्याची समस्या, शहरातील रस्त्याची दुरावस्था, साफसफाई आदी मागण्याचे निवेदन आयुक्तांना देऊन याबाबत चर्चा केली. यावेळी आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून कामाचे आदेश दिल्याची माहिती शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी दिली.
यावेळी शिष्टमंडळा मध्ये काँग्रेसच्या माजी नगरसेविका व गटनेत्या अंजली साळवे, ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी फामिदा सय्यद, दीपक गायकवाड, अन्सार शेख आदीजन उपस्थित होते.