उल्हासनगर : राज्यात नव्हेतर देशात विविध बाजारपेठामुळे शहराने दबदबा निर्माण केला. मात्र शहर स्थापनेला ७४ वर्ष उलटूनही सत्ताधाऱ्यांचा उल्हासनगरचे सिंगापूर करण्याचा दावा फोल ठरला. आजही मूलभूत समस्या कायम असून शहरातून उल्हासही गेल्याची टीका होत आहे.
फाळणी वेळी पाकिस्तानाच्या सिंध प्रांतातून सिंधी समाजसह अन्य समाज बांधवाना देशाच्या विविध भागात वसविण्यात आले. मात्र सर्वाधिक संख्येने कल्याण येथील ब्रिटिशकालीन छावणीतील बैरेक व खुल्या जागेत निर्वासित बहुसंख्य सिंधी समाजाला वसविण्यात आले. त्यांच्या विकासासाठी तत्कालीन शासनाने आयटीआय, लघु उधोग, धंदे, शिक्षण सुरू केले. निर्वासित छावणीच्या बाजूने उल्हास नदी वाहत असल्याने, नदीच्या नावावरून छावणीला भारताचे पहिले गव्हर्नर सी गोपालाचार्य यांनी उल्हासनगर नाव देण्यात आले.
सिंधी बांधवाने उधोगधंदे व व्यापारात प्रगती करून उल्हासनगरच्या नावाचा दबदबा राज्यात नव्हेतर देशात केला. फर्निचर बाजार, कपड्याचे जपानी व गजानन मार्केट, इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल मार्केट, गाऊन मार्केट, बॅग मार्केट, जीन्स पॅन्ट मार्केट आदी शहरातील मार्केट प्रसिद्ध आहे. स्थानिक नेत्यांनी शहराला सिंगापूर करण्याचे आश्वासन दिले, मात्र शहराचा चेहरा जैसे थे राहिल्याची खंत नागरिक बोलून दाखवीत आहेत.
शहराच्या ७४ वा वर्धापनदिन साजरा करतांना, आजही नागरिक पाणी, रस्ते, साफसफाई, आरोग्य आदी मूलभूत समस्यासाठी झुंजत असल्याचे चित्र शहरात आहे. महापालिका मुख्यालय मागील तरण तलाव येथे ठेवण्यात आलेल्या ऐतिहासिक शहर स्थापनेच्या शिलालेखाची पूजा करण्यात येते. मात्र येथील शिलालेख इतरत्र सुरक्षितस्थळी हलविण्याची मागणी वर्षानुवर्षे होत आहे.
वर्धापनदिनाचा कार्यक्रम सोडलातर येथे वर्षभर धिंगाणा सुरू असून हा ऐतिहासिक शिलालेखाचा अपमान होत असल्याची भावना अनेक जण व्यक्त करतात. ७४ वा वर्धापन दिवस साजरा करणाऱ्या शहराला शासनाने विविध सवलती देऊनही, शहरात पाणी टंचाई, अवैध बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर, दुरावस्था झालेले रस्ते, आरोग्य सुविधा, साफसफाईचा उडालेला बोजवारा, हक्काचे डम्पिंग ग्राऊंड नाही. खुल्या जागा, आरक्षित भूखंड व शासकीय जागेवर होणारे अतिक्रमण आदी प्रकारात वाढ होत आहे.
वर्धापनदिन विविध कार्यक्रम
महापालिकेने एतिहासिक शिलालेखाचा परिसर स्वच्छ करून सजावट केली. तसेच मंगळवारी सकाळी ९ वाजता रैलीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालय आदीच्यांवतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.