उल्हासनगर : शहाड फाटक परिसरातील दुकान व गोदामावर छापा टाकून अन्न व औषध प्रशासन विभागाने तब्बल ८२ हजारांचा पान मसाला व सुगंधी सुपारीचा साठा मंगळवारी दुपारी १ वाजता जप्त केला. अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी अरुणा विरकायदे यांच्या तक्रारीवरून अब्दुल हमीद कादर शेख याच्यावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
------------------
सराफा दुकानात चोरी
उल्हासनगर : चिंचपाडा येथे किसन खरवड यांचे बालाजी ज्वेलर्स नावाचे सोने-चांदीचे दुकान आहे. रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर तोडून दुकानातून साडेचार किलो वजनाचे चांदीचे दागिने व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डीव्हीआर मशीन असा एकूण २ लाख ४७ हजार किमतीचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
--------------------
जुगार खेळताना एकाला अटक
उल्हासनगर : नेहरू चौक गल्लीतील मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी सोमवारी रात्री छापा टाकला. यावेळी जुगाराचे साहित्य जप्त करून रवी पठारे याला अटक केली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
----------------
श्वानाच्या पिल्लांची ताटातूट, गुन्हा दाखल
उल्हासनगर : कॅम्प नं-४ गुरुनानक शाळा परिसर सार्वजनिक रस्त्यावर भटकणाऱ्या एका कुत्रीसह तिच्या ६ पिल्लांची ताटातूट करणाऱ्या विरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या परिसरातील सार्वजनिक रस्त्यावर एक कुत्री तिच्या ६ पिल्लासह राहत होती. शनिवारी दुपारी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान विठ्ठल ठाकरे नावाच्या इसमाने कुत्र्याची पिल्ले पकडून ती मासे मार्केट परिसरात सोडून दिली. कुत्री व पिल्लांची ताटातूट झाल्याने, सतर्क नागरिक राज चोटवानी यांनी याबाबतची तक्रार विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली. विठ्ठलवाडी पोलिसांनी प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६०चे कलम ११(१),(प)प्रमाणे गुन्हा दाखल केला. कुत्री व पिल्लांची ताटातूट करणाऱ्या ठाकरेविरोधात गुन्हा दाखल होताच स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. कुत्रीच्या पिल्लांची शोध मोहीम सतर्क नागरिक व पोलिसांनी सुरू केली आहे.
----------------