उल्हासनगर : जागतिक क्षयरोग दिना निमित्त महापालिके तर्फे रांगोळी, निबंध स्पर्धासह विविध कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी केले होते. कार्यक्रमात डी.टी. कलानी कॉलेजचे विद्यार्थीनी सहभागी घेऊन या जीवघेण्या आजाराबाबत नागरिकांत जागरुकता निर्माण केली.
उल्हासनगर महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने जागतिक क्षयरोग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून यारोगाबाबत नागरिकांत जनजागृती करण्यात आली. २४ मार्च १८८२ साली जर्मन फिजिशियन आणि मायक्रोबायोलॉजिस्ट रॉबर्ट कॉक्स यांनी २४ मार्च १८८२ साली जीवघेण्या क्षयरोग आजाराच्या बॅक्टेरियाचा शोध लावला होता. त्यामुळे क्षयरोगाच्या निदानामध्ये आणि उपचारामध्ये मोठी मदत मिळाली होती. त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला. आणि त्याला दिनांक २४ मार्च रोजी मान्यता मिळाली. म्हणून दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली.
दरवर्षी एक थीम महापालिकेच्या वतीने तयार केली जाते. क्षयरोग हा एक संक्रमक आजार आहे. मायक्रो ट्युबरक्लुलोसिस बॅक्टेरियामुळे क्षयरोग होतो. या रोगाचा क्षयरोग ग्रस्त रोग्याच्या खोकणे किंवा शिंकणे या माध्यमातून अन्य लोकांमध्ये प्रसार होतो. या रोगाबद्दल योग्य मार्गदर्शन आणि उपचार केल्यास याचे निदान होऊ शकते. जर या रोगामध्ये निष्काळजीपणा केला तर त्यामुळे मृत्यु ओढवू शकतो.
जागतिक आरोग्य संघटनेने २०३० पर्यंत या जीवघेण्या आजाराचे जगातून उच्चाटन करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी लक्ष निर्धारण आणि नियोजन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे, भारताने २०२५ पर्यंत देशातून या रोगाचे उच्चाटन करण्याचा संकल्प केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार जगभरात दर दिवशी ४ हजार लोकांचा मृत्यु क्षयरोगाने होतो. भारतात क्षयरोगाच्या रुग्णांची संख्या मोठी असून आशियाई देशात भारताचा क्रमांक पहिला आहे. यामुळे भारत सरकारच्या वतीने जागतिक आरोग्य संघटनेने ठरवलेल्या लक्षाच्या आधीच देशातून क्षयरोगाचे उच्चाटन करण्यासाठी कार्यक्रमा आखण्यात आला आहे.